विमानतळावरील उड्डाणे तरीही """"लॉक""""
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:15 AM2020-12-05T04:15:41+5:302020-12-05T04:15:41+5:30
पुणे : देशांतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांना उड्डाणाची क्षमता ८० टक्क्यांपर्यंत वाढविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पुणे ...
पुणे : देशांतर्गत प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्यांना उड्डाणाची क्षमता ८० टक्क्यांपर्यंत वाढविण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, पुणे विमातळावरील उड्डाणे वाढविण्याला मर्यादा आहेत. विमानतळ रात्री ८ ते सकाळी ८ यावेळेत बंद असल्याने उड्डाणाची संख्या शंभरीही गाठणार नाही, हे चित्र आहे.
लॉकडाऊन काळात काही महिने विमान वाहतूक सेवा ठप्प होती. निर्बंध शिथिल झाल्यानंतर सुरुवातीला ३३ टक्के वाहतुकीला परवानगी देण्यात आली. टप्प्याटप्प्याने हे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले. त्यामुळे देशातील रोजची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. प्रवासी वाढत असताना शारीरिक अंतर, स्वच्छता, मास्क आदी दक्षता घेतल्या जात आहेत. त्यामुळे विमान उड्डाणाचे प्रमाण ८० त्यांपर्यंत नेण्यात आले आहेत. त्यामुळे विमान कंपन्यांसह प्रवाशानंही दिलासा मिळणार आहे. मात्र, यापासून पुण्यातून येजा करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार नाही.
विमानतळ संचालक कुलदीप सिंग यांनी यापूर्वीच दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या स्थितीत शाररिक अंतराचा विचार केल्यास प्रत्येक तासाला ५०० प्रवासी येजा करू शकतात. याचा विचार केल्यास दर तासाला ८ विमानांचीच येजा होऊ शकते. यानुसार सध्या रोज अधिकाधिक ९६ विमानाची येजा होऊ शकते. लोकडाऊन पूर्वी हे प्रमाण जवळपास १६० हुन अधिक होते. सध्या रोज ६५ ते ७० विमानाची येजा होत आहे. रोजची प्रवासी संख्या ७ ते ८ हजार एवढी आहे. लोकडाऊन पूर्वी ही संख्या सुमारे १८ ते २० हजार होती. विमान कंपन्यांना आता ८० टक्के वाहतुकीस परवानगी दिली असली तरी विमानतळाची मर्यादा पाहता आणखी विमाने वाढण्याची शक्यता नाही. त्यामुळे याचा फायदा प्रवाशांना मिळणार नाही, असे दिसते.
-------