तरंगती लोकसंख्या मोजण्याचा फॉर्म्युलाच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:49 AM2019-01-10T01:49:38+5:302019-01-10T01:49:58+5:30

नोंदणीच होत नाही : ५ लाखांपेक्षा जास्त असल्याचा दावा

Floating population does not have to count the population | तरंगती लोकसंख्या मोजण्याचा फॉर्म्युलाच नाही

तरंगती लोकसंख्या मोजण्याचा फॉर्म्युलाच नाही

googlenewsNext

राजू इनामदार

पुणे : महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या आदेशाप्रमाणे महापालिका वॉटर बजेट तयार करत आहे. मात्र, लोकसंख्येची सर्वसाधारण आकडेवारी मिळत असली तरी तरंगती लोकसंख्या (शिक्षण, काम, नोकरी यानिमित्ताने शहरात येणारा जाणारा वर्ग) मोजण्याचे कसलेही साधन किंवा फॉर्म्युलाही जनगणना कार्यालयाकडे नाही. त्यामुळे पाण्याचा कोटा वाढवून घेताना या एका मुद्द्यावर पालिकेची अडचण होणार आहे.

प्राधिकरणाने महापालिकेला येत्या तीन महिन्यांमध्ये वॉटर बजेट तयार करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी महापालिकेला पाण्याचा सविस्तर अहवालच तयार करावा लागणार आहे. त्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. सर्वसाधारण निवासी लोकसंख्येची आकडेवारी जनगणना कार्यालयाकडून उपलब्ध होते. त्यात आसपासच्या गावांच्या लोकसंख्येचाही समावेश आहे. मात्र त्याशिवाय तरंगती लोकसंख्या हाही एक महत्त्वाचा मुद्दा त्यात आहे. महापालिकेच्या म्हणण्यानुसार शहरात किमान ५ लाख लोक रोज येतात-जातात, महिनादोन महिने किंवा विद्यार्थी वगैरे असतील तर वर्ष दोन वर्षे राहतात. या सर्वांना रोज पाणी द्यावे लागते. महापालिकेच्या मंजूर कोट्यातीलच पाणी ते वापरत असतात. ही तंरगती लोकसंख्या मोजलीच जात नाही.

जनगणना कार्यालयाकडे ही लोकसंख्या मोजण्याचा कसलाच फॉर्म्युला नाही. हे कार्यालय महापालिकेचेच आहे. ते मुख्य जनगणना कार्यालयाशी संलग्न आहे. त्यांच्याकडून या लोकसंख्येची कसलीच नोंद होत नाही. महापालिकाही त्यांच्या स्तरावर अशी काही नोंद करत नाही. गेल्या काही वर्षांत पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येऊन राहणाऱ्यांचीच संख्या लाखापेक्षा जास्त आहे. या विद्यार्थ्यांची कसलीही नोंद होत नाही. नोकरीतील बदली, व्यवसाय, काम यामुळे राहणारेही असेच काही लाखांच्या आसपास आहेत. महापालिका ही एकूण संख्या ५ लाख आहे, असे सांगत असली तरीही त्याला कसलाच आधार नाही. त्यामुळे ही लोकसंख्या दाखवून वाढीव पाणी मागणे अडचणीचे होणार आहे.

कोणतीही पद्धत वापरात नाही
1 सरकारी स्तरावर सन २०११ ची जनगणना वापरली जात असते. त्यानुसार पुणे शहराची लोकसंख्या ३५ लाख आहे. वाढीव लोकसंख्या मोजण्याची जनगणना कार्यालयाची एक पद्धत आहे. त्यानुसार आधीची १० वर्षांपूर्वीची जनगणना आकडेवारी व सुरू असलेल्या वर्षातील आकडेवारी यातील फरक लक्षात घेऊन टक्केवारी काढली जाते.
2 ती जेवढी येईल ती १० वर्षांत विभागली जाते. वर्षाला किती लोकसंख्या वाढली, त्याचे उत्तर त्यात मिळते. ही पद्धत सर्वमान्य आहे. त्यानुसार पुढील १० वर्षांत प्रत्येक वर्षी लोकसंख्येत तेवढी वाढ गृहित धरली जाते.
3 पुणे शहराच्या सन २००१ व सन २०११ या दोन जनगणनामधील फरक ३० टक्के आहे. त्याप्रमाणे दरवर्षी म्हणजे सन २०१२ मध्ये ३ टक्के, सन २०१३ मध्ये ३ टक्के अशी वाढ गृहित धरण्यात आली आहे. तरंगती लोकसंख्या मोजण्यासाठी मात्र कोणतीही पद्धत वापरात नाही.
 

Web Title: Floating population does not have to count the population

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे