एसआरए पालिका वादात पूरग्रस्त अधांतरीच
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 12:44 PM2019-11-02T12:44:42+5:302019-11-02T12:46:43+5:30
२५ सप्टेंबरच्या अतिृष्टीमुळे आंबिल ओढ्याला आलेल्या पुरात या कुटुंबांचे घरदार उद्ध्वस्त झाल्याने, हे सर्व जण महापालिकेच्या धर्मवीर संभाजीराजे हायस्कूल शाळा क्रमांक १७ मध्ये राहत आहेत़.
पुणे : महापालिकेने यादी सादर केली, की पात्रता तपासणी करून शाळेत मुक्कामी असलेल्या पूरग्रस्त कुटुंबांना आम्ही घरे देऊ, अशी भूमिका एसआरए प्रशासनाने घेतली आहे़. तर, दांडेकर पूल येथील लाभार्थींची पात्रता यादी यापूर्वीच एसआरएला देण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे़. परंतु, या दोघांच्या दाव्या-प्रतिदाव्यामध्ये पूरग्रस्त कुटुंबांची गेले महिनाभर मोठी अवहेलना झाली आहे़.
२५ सप्टेंबरच्या अतिृष्टीमुळे आंबिल ओढ्याला आलेल्या पुरात या कुटुंबांचे घरदार उद्ध्वस्त झाल्याने, हे सर्व जण महापालिकेच्या धर्मवीर संभाजीराजे हायस्कूल शाळा क्रमांक १७ मध्ये राहत आहेत़. पण, आता दिवाळीच्या सुट्यांनंतर शाळा सुरू झाल्यावर आपण जायचे कोठे, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे़. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत यांचे पुनर्वसन होणे जरुरी होते़. मात्र, गेली कित्येक वर्षे एसआरए व महापालिका प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवून, तांत्रिक अडचणींचा मुद्दा उपस्थित करीत असल्याचा आरोप पूरग्रस्त कुटुंबीयांनी केला़.
दरम्यान, शाळेतील बाधित कुटुंबीयांची यादी पालिकेकडून एसआरए प्रशासनाला लागलीच सुर्पूत केली जाणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले़ .तर, ही यादी मिळाल्यावर पात्र व अपात्र यांची छाननी करून, संबंधितांचे राजेंद्रनगर येथील एसआरए योजनेत पुनर्वसन केले जाणार असल्याचे एसआरए प्रशासनाने सांगितले आहे़.
परिणामी, शाळा सूरू होण्यापूर्वी या कुटुंबांना हक्काचे घर मिळेल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे़ .
.........
यादी एसआरएकडे पाठविणार
दांडेकर पूल येथील लाभार्थींची यादी पालिकेने यापूर्वीच एसआरए प्रशासनाला पाठविली होती; परंतु ती मिळाली नसल्याचेच एसआरएकडून सांगण्यात आल्याने, आम्ही उद्या (शनिवारी) ही यादी पुन्हा एसआरएकडे पाठविणार आहोत़. २५ सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे बाधित झालेली २६ कुटुंबे पालिकेने शाळा क्रमांक १७ मध्ये स्थलांतरित केली असून, त्यांची सदस्यसंख्या ही ९२ इतकी आहे़.नव्याने काही कुटुंबे येथे घुसली असतील तर त्याची माहिती घेतली जाईल़ - माधव देशपांडे, उपायुक्त पुणे महापालिका़
................
पात्रता तपासून पुनर्वसन करणार
दांडेकर पूल येथील पात्र रहिवाशांची यादी कधीही एसआरएकडे पाठविण्यात आलेली नाही़ शाळेतील पूरग्रस्त कुटुंबांची यादी आमच्याकडे अद्यापही नाही़ त्यामुळे पालिकेने यादी पाठविली तरी पात्रता तपासून संबंधितांचे पुनर्वसन राजेंद्रनगर येथील एसआरएमध्ये केले जाणार असून, प्रथम येथे घुसलेल्या अनधिकृत कुटुंबांना बाहेर काढण्यासाठी पोलिसांची मदत घेतली जाईल. - राजेंद्र निंबाळकर, एसआरए प्रमुख़