‘कृष्णे’च्या धर्तीवर भीमा खोऱ्यातील पुराचा होणार अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:09 AM2021-06-01T04:09:56+5:302021-06-01T04:09:56+5:30
भीमा खोरे अभ्यास गटाची स्थापना : पुणे, मुंबई, नागपूर आणि दिल्लीतील संस्थांची निवड भाग - १ पुणे : दोन ...
भीमा खोरे अभ्यास गटाची स्थापना : पुणे, मुंबई, नागपूर आणि दिल्लीतील संस्थांची निवड
भाग - १
पुणे : दोन वर्षांपूर्वी कृष्णा नदीला अतिवृष्टीमुळे महापूर आला होता. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हाहाकार उडाला होता. तशी परिस्थिती भीमा खोऱ्यात उद्भवू नये यासाठी मुख्यतः भीमा खोऱ्यातील भीमा नदी आणि उपनद्यांच्या पूरपरिस्थितीची कारणे आणि उपाययोजना करण्यासाठी सुधारित समिती (अभ्यास गट) राज्य शासनाने स्थापन केली आहे. पुणे, मुंबई, नागपूर आणि दिल्लीतील प्रमुख शासकीय संस्थांच्या दहा सदस्यांची निवड केली आहे. पुढील चार महिन्यांत ही समिती आपला अहवाल शासनाला सादर करणार आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आणि जलसंपदा (लाक्षेवि) विभागाचे सेवानिवृत्त सचिव राजेंद्र पवार यांनी दिली.
या समितीचे अध्यक्ष आणि जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त प्रधान सचिव नंदकुमार वडनेरे यांनी राजीनामा दिल्याने शासनाने सुधारित समिती स्थापन करून राजेंद्र पवार यांची अध्यक्षपदी निवड केली आहे. ही समिती संपूर्ण भीमा खोऱ्याची पाहणी करून मुख्यतः पूरपरिस्थिती उद्भवण्याची कारणे, त्यासाठी तातडीने करायच्या उपाययोजना आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवणार आहे.
---
राज्यस्तरीय अभ्यासगटातील सदस्य
अध्यक्षपदी राजेंद्र पवार (जलसंपदा विभाग, सेवानिवृत्त सचिव) यांची, तर सदस्यपदी विनय कुलकर्णी (सेवानिवृत्त सचिव), अविनाश सुर्वे (सेवानिवृत्त सचिव), रवी सिन्हा (आयआयटी मुंबई), नित्यानंद रॉय (मुख्य अभियंता, केंद्रीय जल आयोग, दिल्ली), जलसंपदा विभागाचे मंत्रालयातील सचिव, नागपूरच्या महाराष्ट्र सुदूर संवेदना उपयोजिता केंद्राचे संचालक, भारतीय हवामान विभाग मुंबईचे उपसंचालक, आय.आय.टी. एम पुणेचे संचालक आणि जलसंपदा विभाग मंत्रालयातील (लाक्षेवि सचिव) आदी दहा सदस्य भीमा खोऱ्यातील पुराची पाहणी करून अहवाल देणार आहेत.
---
स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार
भीमा खोरे हे गोदावरी खोऱ्यानंतर राज्यातील दुसरे महत्त्वाचे खोरे आहे. या खोऱ्यात पर्जन्यमान चांगले आहे. खोऱ्यातील मार्गावर अनेक ठिकाणी महत्त्वाची शहरे आहेत. त्यामुळे काही ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. त्याचबरोबर इतर कारणे आहेत. त्यामुळे ठिकठिकाणच्या महापालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्था यांचीही मदत घेण्यात येणार आहे. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका नदी सुधार योजना राबवत आहेत. त्यांची यासाठी मदत होईल. तसेच पुणे शहरातील अतिवृष्टी, पूर आणि नदी या विषयांत काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांची मदत यात घेतली जाणार आहे, असे राजेंद्र पवार यांनी सांगितले.
---
भीमेचे उगमस्थान, उपनद्या आणि मार्ग
* भीमा नदीचे उगमस्थान :-
पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथून सुरू होत आहे.
* उपनद्या :-इंद्रायणी, भामा, पवना, मुळा, मुठा, घोड, मीना, कुकडी, पुष्पावती, वेळ, घोड, नीरा, माण, सीना आणि भोगावती.
* भीमा खोऱ्याचा प्रवाहमार्ग :- संपूर्ण पुणे जिल्हा- अहमदनगर जिल्ह्याचा काही भाग-सातारा जिल्ह्याचा काही भाग-सांगली जिल्ह्याचा काही भाग-सोलापूर जिल्ह्यातून कर्नाटक राज्यात प्रवेश.