मुठेचे पात्र आक्रसल्याने पूरस्थितीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 12:18 PM2019-08-07T12:18:42+5:302019-08-07T12:25:18+5:30

नदीत झालेली अतिक्रमणे, टाकलेला राडारोडा, कचरा या गोष्टींमुळे नदीची वहनक्षमता कमी झाली आहे.  

FLOOD condition created in pune city due to attack on mutha river area | मुठेचे पात्र आक्रसल्याने पूरस्थितीचा फटका

मुठेचे पात्र आक्रसल्याने पूरस्थितीचा फटका

Next
ठळक मुद्देनदीपात्राचा घेतला घास : ‘जलसंपदा’ची पाणी सोडताना होतेय कसरत

पुणे : घाटमाथ्यावर झालेल्या अतिवृष्टीमुळे दोन दिवस-रात्र तब्बल ४५ हजार ४४७ क्युसेकने पाणी मुठा नदीत सोडावे लागले. पाण्याचा हा विसर्ग नैसर्गिक धोक्याच्या पातळीच्या निम्म्याने खाली आहे. नदीसह शहरातील नाल्यांचा घास घेतल्याने पन्नास हजार क्युसेक आतील विसर्गदेखील सोसवत नसल्याचे चित्र आहे. नदीत झालेली अतिक्रमणे, टाकलेला राडारोडा, कचरा या गोष्टींमुळे नदीची वहनक्षमता कमी झाली आहे.  
खडकवासला साखळीतील टेमघर, पानशेत, मुळशी आणि खडकवासला ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. खडकवासलातून शनिवारी २७ हजार २०३ क्युसेकने पाणी मुठा नदीत सोडण्यात येत होते. त्यात सोमवारपर्यंत तब्बल ४५ हजार ४७४ पर्यंत वाढ करण्यात आली. धरणक्षेत्रात पावसाचा जोर असल्याने दोन दिवस याच वेगाने मुठा नदीत पाणी सोडण्यात येत होते. 
या पाण्यामुळे नदीलगतच्या सोसायट्या, झोपडवस्त्या आणि रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्णांनादेखील सुरक्षित स्थळी हलविण्याचे वेळ प्रशासनावर आली. जवळपास तेरा हजारांहून अधिक व्यक्तींची जिल्हा प्रशासनाने समाज मंदिर, शाळांमधे सोय केली. काही हजार रहिवाशांनी नातेवाईकांच्या घराचा आसरा घेतला. मात्र, अगदी पन्नास वर्षांपूर्वी याच नदीने तब्बल १ लाख १३ हजार क्युसेकचा विसर्ग लीलया वाहून नेला आहे. अगदी १९९७ लादेखील ९०,५७० क्युसेकचा विसर्ग या नदीतून पुढे गेला आहे. यंदा मात्र, ४५ हजार क्युसेकच्यावर विसर्ग जाताच जलसंपदाकडे विसर्ग कमी करण्यासाठी दबाव वाढू लागला. भरलेली धरणे आणि सुरू असलेला पाऊस यामुळे दोन दिवस जलसंपदाला पाण्याचा विसर्ग कमी करणेच शक्य नव्हते. त्यामुळे अधिकाºयांना विसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी कसरत करावी लागली. महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूटचे (मेरी) माजी महासंचालक डी. एम. मोरे म्हणाले, की नदीचा वाहण्याचा नैसर्गिक मार्ग आणि पात्राची रुंदीही ठरलेली असते. मुठा नदीच्या पात्रातच नाल्यासारखे दोन्ही बाजूंनी काँक्रिटची भिंत बांधली आहे. नदीच्या पात्रातही घरे आहेत. 
...........
नदीकिनारी सिमेंटचे बांधकाम करणे धोकादायक आहे. कारण त्यामुळे तिथे पाणी मुरत नाही. कारण नदीकिनारची जमीन ही दलदलच असायला हवी. त्यात छोट्या जिवांची परिसंस्था जगत असते. तसेच त्या दलदलीमुळे पाणीही मुरत असते. परंतु, सिमेंटच्या भिंती बांधल्यामुळे पाणी मुरतच नाही. अशा जमिनीला पाणथळ म्हटले जाते. ते नैसर्गिकरीत्या जैवविविधतेसाठी आवश्यक असते. परंतु, अशी पाणथळ जमीन सिमेंटच्या भिंतीने नष्ट झाली आहे. 
........
४५ हजार क्युसेक विसर्गही झेपेना
गरिबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वच स्तरातील व्यक्तींनी नदीपात्रावर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे केवळ ४५ हजार क्युसेक पाण्याच्या विसर्गाने पूरस्थिती ओढविल्याचे चित्र होते. यापूर्वी इतक्या विसर्गामुळे पूरस्थिती उद्भवल्याचे स्मरत नाही. मुठा नदीची ही वाताहत खडकवासला धरणाच्या भींतीपासून पुढे सुरू होते. नांदेड परिसरात आणखी विदारक चित्र आहे. - डॉ. डी. एम. मोरे, माजी महासंचालक महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट 
.........
या पूर्वीचा विसर्ग 
(क्युसेकमध्ये)
१९४३    ८०,७६६
१९५४    १,०५,१४०
१९५८     १,१३,३९२ 
१९८३    ८६,४९०
१९९७    ९०,५७०
५ आॅगस्ट २०१९    ४५,४७४
.....
 

Web Title: FLOOD condition created in pune city due to attack on mutha river area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.