आळंदीत इंद्रायणीच्या महापूराने रस्ता पोखरला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:08 AM2021-07-24T04:08:26+5:302021-07-24T04:08:26+5:30
त्यामुळे दळणवळणास धोका निर्माण झाला आहे. दरम्यान गुरुवारी (दि.२२) रात्री या रस्त्यावर बॅरिकेट लावून वाहतुक बंद करण्यात आली आहे. ...
त्यामुळे दळणवळणास धोका निर्माण झाला आहे. दरम्यान गुरुवारी (दि.२२) रात्री या रस्त्यावर बॅरिकेट लावून वाहतुक बंद करण्यात आली आहे. दोन - तीन दिवसांपासून इंद्रायणी नदीची पाणी पातळी वाढत चालली आहे. मात्र गुरुवारी सायंकाळी चारनंतर ही पाणीपातळी अधिकच वाढली असून प्रवाहाच्या गतीतही कमालीची वाढ झाली. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पश्चिमेकडील बाजूला बंधाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचा काही भाग जोरदार वाहणाऱ्या पाण्याने पोखरला आहे. परिणामी संबंधित रस्त्यावरील वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे. लोणावळा परिसरात पावसाचा जोर आणखी वाढत असल्याने इंद्रायणीची पाणी पातळी रात्रीच्या वेळी अधिक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने संबंधित रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे.
दरम्यान नगरपालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. तसेच आळंदी व दिघी पोलीस ठाण्याला इंद्रायणी तीरावर खबरदारी म्हणून पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी लेखी पत्र दिले असल्याची माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी दिली.
--
फोटो : क्यू जुलै २३ आळंदी इंद्रायणी
फोटो क्रमांक : फोटो ओळ : आळंदीत इंद्रायणीला आलेल्या महापुराने तीरालगतचा रस्ता पोखरला आहे. ( छायाचित्र भानुदास पऱ्हाड)