पुण्यात ‘सायबर’कडे तक्रारींचा पूर; सात महिन्यांत १५ हजार तक्रारी, गुन्हे दाखल मात्र शेकड्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 09:58 AM2022-08-01T09:58:42+5:302022-08-01T10:00:10+5:30
गेल्या वर्षीच्या तक्रारी अजूनही प्रलंबित...
पुणे : नागरिकांच्या हातात मोबाईल अन् इंटरनेट आल्याने सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. हाच फायदा घेत सायबर चोरटे नागरिकांना लक्ष्य करीत आहेत. वेगवेगळ्या युक्त्या करून हे सायबर चोरटे नागरिकांचे बँक खाते रिकामे करीत आहेत. पुणे सायबर पोलीस ठाण्यात दररोज साधारण १०० हून अधिक तक्रारी येत आहे. गेल्या सात महिन्यांत जवळपास १५ हजारांहून अधिक तक्रारी आल्या असून, त्यापैकी जवळपास १२५ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
‘ऑनलाईन लोन’च्या वाढत्या तक्रारी
कोणत्याही कागदपत्रांशिवाय ऑनलाईन लोन देणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून सायबर चोरटे नागरिकांची लुबाडणूक करताना दिसत आहेत. संबंधिताला काही हजार रुपये कर्ज तातडीने देत ॲप डाऊनलोड करायला सांगितले जाते. त्याद्वारे त्याच्या मोबाईलमधील सर्व डाटा घेतला जातो. त्यानंतर त्याची बदनामी करण्याची धमकी देऊन लुबाडणूक सुरू होते. अशा दोन हजारांहून अधिक तक्रारी पुणे सायबर पोलीस ठाण्यात आल्या आहेत.
अपुरे मनुष्यबळ
माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आल्यास त्याचा तपास पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी करू शकतो. सायबर सेलकडे मनुष्यबळ अपुरे आहे. त्यामुळे तेथील अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कामाचा बोजा असतो. त्यामुळे आता सर्व पोलीस ठाण्यांना सायबरचे गुन्हे दाखल करून घेण्यास सांगण्यात येत आहे.
अडचणी काय?
सायबर गुन्ह्यांतील आरोपी शक्यतो परप्रांतीय किंवा विदेशातील असतात. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक दिवस, वेळ खर्च करावा लागतो. काही प्रकरणांमध्ये आरोपी निष्पन्न होत नाही. दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी पोलिसांना वाहनासह इतर खर्च मिळण्यात अडचणी येतात. आरोपीने बनावट नाव धारण केलेले असते. त्यामुळे त्याचा शोध घेणे सहज शक्य होत नाही.
गेल्या वर्षीच्या तक्रारी अजूनही प्रलंबित
सायबर पोलीस ठाण्यात ऑक्टोबर २०२१ मध्ये दाखल केलेल्या तक्रार अर्जाची प्राथमिक चौकशी होऊन आता ते पुढील तपासासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले जात आहे.