पूरामुळे जिल्ह्यात कोट्यवधींचे नुकसान : नवल किशोर राम
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 09:00 PM2019-09-26T21:00:41+5:302019-09-26T21:03:57+5:30
शहरासह जिल्ह्यातील काही भागात कमी वेळेत जोरदार वृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली.
पुणे : जिल्ह्यामध्ये बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे पुणे शहर आणि जिल्ह्यामधे १४ जणांचा मृत्यू झाला असून, ९ जण बेपत्ता आहेत. लहान-मोठी ८३२ जनावरे मृत झाली आहेत. हवेली, पुरंदर आणि बारामती तालुक्याला पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. शहरातील हजारो वाहने पाण्याखाली अथवा वाहून गेली असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. सहकारनगरमधील अरण्येश्वर परिसरातील दीड ते दोन हजार वाहने पाण्याखाली गेली होती. त्यामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीचा अंदाज आहे.
शहरासह जिल्ह्यातील काही भागात कमी वेळेत जोरदार वृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरात मालमत्तेचे तुलनेने मोठे नुकसान झाले आहे. नाझरे धरणातून कऱ्हा नदीत मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्याने बारामती तालुक्यातील २१ गावांना फटका बसला. येथील ३८ मदत शिबिरामधे अडीच हजार नागरिकांना स्थलांतरीत करण्यात आले. पुणे शहरातील ३ हजार नागरिकांना काही काळासाठी इतरत्र हलविण्यात आले होते.
हवेलीतील खेड-शिवापूर, कात्रज, आंबेगाव येथे जोरदार पाऊस झाला. येथील सात गावांना पावसाचा फटका बसला. पुरंदरमधील २४ आणि भोर तालुक्यातील एक गाव पावसामुळे बाधित झाले आहेत. दरड कोसळल्यामुळे हवेली आणि पुरंदरमधील प्रत्येकी २ आणि भोरमधील १ रस्ता बंद झाला. सासवड-जेजुरी मार्ग देखील काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेने दिली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत या वेळी उपस्थित होते.
------------------
अतिवृष्टीमुळे मृत जनावरे
तालुका लहान मोठी वाहून गेलेली (बेपत्ता)
हवेली ३५० ४ -
पुणे शहर १४ १६ १४
पुरंदर ४२४ २४ -
एकूण ७८८ ४४ १४