पुरामुळे शेतजमिनी गेल्या वाहून : शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 07:18 PM2019-08-12T19:18:53+5:302019-08-12T19:23:46+5:30
धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होऊन पूर आला.
पाटेठाण : खडकवासला धरणातून सोडलेल्या पाण्याने मुळा-मुठा नदीला महापूर आला आहे. महापुरामुळे पिंपळगाव आणि राहू (ता. दौंड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यालगतच्या दोन्ही बाजूकडील शेतीमधील माती मोठ्या प्रमाणात वाहून गेली आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. पिंपळगाव (ता. दौंड) येथील शेतकरी दामू पडवळ आणि राहू येथील दिनकर शिंदे यांची राहू (ता. दौंड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यालगत संरक्षक भिंतीलगत बागायत शेती आहे. धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे मुळा-मुठा नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होऊन पूर आला. पुराच्या पाण्याच्या प्रवाहात जमिनीतील माती वाहत गेल्याने जमीन ३० फूट खोल व ४० फूट लांबपर्यंत वाहून गेली आहे. पाणीपुरवठा करीत असलेला कृषी विद्युत पंपही मातीसह वाहून गेला आहे. बंधाऱ्यालगत कायमस्वरुपी संरक्षक भिंत बांधावी व नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी दामू पडवळ, उमेश शिंदे यांनी केली आहे.
......
राहू (ता. दौंड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाºयालगतची संरक्षक भिंत व लगत असलेल्या शेतकºयांच्या शेतजमिनीच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यात आली आहे. विशेष दुरुस्तीअंतर्गत शासनास अंदाजपत्रकीय किंमत एक कोटी ३८ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर केला आहे. मंजुरीनंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
- गणेश टेंगले, सहायक अभियंता श्रेणी - २, राहू जल उपसासिंचन शाखा, यवत
...............................................................................