निसर्गातील असंतुलनामुळे पुराचा फटका : माधव गाडगीळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 08:01 PM2019-11-22T20:01:48+5:302019-11-22T20:06:19+5:30
गेल्या दोन वर्षांपासून केरळामध्ये पूर
पुणे : गेल्या दोन वर्षांपासून केरळामध्ये पूर येत आहे. तिथले वातावरणामुळे तिथे खूप पाऊस होतो. आम्ही तिथल्या निसर्ग संवर्धनाबाबत २०११ मध्ये केरळ सरकारला अहवाल दिला होता. परंतु, त्या अहवालाकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी गतवर्षी आणि यंदा केरळात पूर आला आणि प्रचंड नुकसान झाले. आता केरळचे मुख्यमंत्री जागरूक झाले असून, त्या अहवालाबाबत विचार करू, असे म्हणत आहेत, अशी माहिती ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांनी लोणावळा येथे दिली.
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे (बीएनएचएस) निसर्ग संवर्धनाचे पुरस्कार प्रदान सोहळा शुक्रवारी लोणावळा येथे झाला. यामध्ये निसर्ग संवर्धनाचा डॉ. सालीम अली राष्ट्रीय पुरस्कार गाडगीळ यांना प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार अलेक्झांडर लुईस पील यांना देण्यातआला. ‘इंडियन बर्ड मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाºया डॉ. सालीम अली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बीएनएचएसतर्फे १९९६ पासून हे पुरस्कार देण्यात येतात. बीएनएचएसतर्फे पाणथळ जागा आणि स्थलांतरित पाणपक्षी या विषयावर लोणावळा येथे १८ पासून परिषद सुरू होती. आज (दि. २२) परिषदेच्या समारोपला हे पुरस्कार प्रदान केले. मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अलेक्झांडर पील हे लायबेरिया देशातील जैवविविधता आणि वारसा यांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी देशातील पहिले सापो राष्ट्रीय उद्यान आणि सोसायटी फॉर द कॉन्झर्वेशन ऑफ नेचर ऑ फ लायबेरिया या पहिल्या स्वयंसेवी संस्थांची उभारणी केली आहे. पर्यावरणसंवर्धनाचा सामुदायिक पुरस्कार नागालॅँडमधील त्सुसेकी आणि लिंथुरे यांना देण्यात आला. दोघांनी सामुदायिक जमिनीवर वृक्षलागवड अभियान राबविले आहे.
दरम्यान, यंदापासून जे. सी. डॅनिअल कॉन्झर्वेशन लीडर अॅवॉर्ड फॉर यंग मेन आणि वुमेन या नावाने देण्यात येत आहे. हे पुरस्कार अनंत पांडे आणि सोनाली गर्ग यांना देण्यात आला. अनंत पांडे गेली दहा वर्षे समुद्री पक्षी परिस्थितीशास्त्र, ध्रुवीय परिस्थितीशास्त्र या विषयावर काम करीत आहेत, तर सोनाली गर्ग पश्चिम घाट आणि श्रीलंकेतील बेडकांवर संशोधन करीत आहेत. त्यांचे संशोधन निबंध प्रसिध्द झालेले आहेत. त्यांच्या संशोधन कार्याद्वारे भारतातील सुमारे एक तृतीयांश तर पश्चिम घाटातील बेडकांची प्राथमिक माहिती संकलित केली आहे. बेडकांच्या चाळीस नवीन प्रजाती आणि दोन नवीन जातींची ओळख त्यांच्यामुळे झाली आहे.
पश्चिम घाटात बेडकाच्या ९० टक्के प्रजाती
सोनाली गर्ग म्हणाल्या, बेडूक हा दुर्लक्षित असून, तो जगातून नष्टप्राय होत आहे. खरंतर आपल्या पश्चिम घाटात जगातील सुमारे ९० टक्के प्रजाती आढळतात. त्यातील अनेक कमी होत आहेत. या बेडकांच्या प्रजाती जपणे आवश्यक आहे. त्यासाठी मी काम करीत आहे. हा पुरस्कार देऊन मला या क्षेत्रात अजून काम करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.’’