Florence Nightingale Award: पुण्याच्या ब्रिगेडियर अमिता देवरानी यांना फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 12:04 PM2023-06-23T12:04:50+5:302023-06-23T12:05:01+5:30
देवराणी सध्या पुणे येथे दक्षिण कमांड (वैद्यकीय)च्या मुख्यालयात ब्रिगेडियर एम. एन. एस. म्हणून कार्यरत आहेत...
पुणे : आरोग्य क्षेत्रात नि:स्वार्थ वृत्तीने सेवा देणाऱ्या आणि राज्याच्या आरोग्य योजनांचा लाभ सर्व स्तरावर पोहोचविणाऱ्या सर्वोत्कृष्ट परिचारिका आणि परिचारक यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २२) २०२२ व २०२३ चे राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यात २०२२ मध्ये राज्यातील १ आणि २०२३ मध्ये २ परिचारिकांचा समावेश आहे. त्यात पुण्यातील दक्षिण कमांड (वैद्यकीय) मुख्यालय ब्रिगेडियर अमिता देवराणी यांचा समावेश आहे.
यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री एस. पी. सिंग बघेल, सचिव राजेश भूषण उपस्थित होते. यावेळी २०२२ मध्ये १५ आणि २०२३ मध्ये १५ अशा ३० परिचारिका आणि परिचारक यांना पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. २०२२ मध्ये मिळालेल्या पुरस्कारांमध्ये पालघर जिल्ह्यातील भुईगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहायक परिचारिका (दाई) सुजाता पीटर तुस्कानो, तर २०२३ मध्ये मिळालेल्या पुरस्कारांमध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयाच्या सार्वजनिक आरोग्य परिचारिका पुष्पा पोडे व दक्षिण कमांड (वैद्यकीय) मुख्यालय पुण्याच्या ब्रिगेडियर अमिता देवराणी यांचा समावेश आहे.
देवराणी सध्या पुणे येथे दक्षिण कमांड (वैद्यकीय)च्या मुख्यालयात ब्रिगेडियर एम. एन. एस. म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी लष्करात ३७ वर्षे परिचारिका म्हणून सेवा बजावली आहे. त्या उत्तम शिक्षक आणि प्रशासक आहेत. त्या लष्कराच्या दक्षिण कमांडअंतर्गत येणाऱ्या भूदल, नौदल आणि हवाई दलाच्या ५० रुग्णालयांचे कामकाज पाहतात. कोरोनाकाळात त्यांनी केलेले काम प्रशंसनीय आहे. आरोग्य क्षेत्राशी संबंधित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी विपुल लेखन केले आहे. काँगो रिपब्लिक या देशात संयुक्त राष्ट्राने राबविलेल्या मोहिमेत संकटग्रस्त परिस्थितीत मृतदेहांचा शोध आणि व्यवस्थापन यासाठी बजावलेल्या कामगिरीबद्दल संयुक्त राष्ट्राने त्यांचे विशेष कौतुक केले आहे. लष्करी शुश्रूषेसाठी त्यांना अनेक पुरस्कार आणि प्रशस्तीपत्रे मिळालेली आहेत.