वाढत्या कोरोनामुळे फुलशेती संकटात, मागणी नसून कवडीमोल भावाने विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:10 AM2021-03-22T04:10:34+5:302021-03-22T04:10:34+5:30
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील निमगाव, रेटवडी, दावडी, खरपुडी या परिसरात मोठ्या प्रमाणात फुलउत्पादक शेतकरी आहे. मागील वर्षी लॉकडाऊन झाल्यामुळे ...
खेड तालुक्याच्या पूर्व भागातील निमगाव, रेटवडी, दावडी, खरपुडी या परिसरात मोठ्या प्रमाणात फुलउत्पादक शेतकरी आहे. मागील वर्षी लॉकडाऊन झाल्यामुळे ऐन फुलांचा सीझन वाया गेला होता. यंदा चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी पिवळा गोंडा, चमेली, अस्टर या फुलांची लागवड केली होती. मात्र, पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे फुल उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कोरोनाने सारे काही उद्ध्वस्त केले आहे. मात्र आज ना उद्या कोरोना जाईल व लग्न आणि यात्रांचा हंगाम सापडेल, त्यात फुलांची विक्री होऊन दोन पैसे हाताशी येतील, अशी अपेक्षा करीत फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना महागडी फुलांची रोपे लावून पोटचा मुलाप्रमाणे वाढविली. मात्र तोडणीस आलेल्या फुलांचे मळे बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी तोडणी बंद केली आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणेही मुश्कील असल्याचे चित्र आहे.लग्नसोहळा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा, जत्रा यांच्यावर निर्बध आले. लग्नसोहळे गावातच व दारासमोरच कमी लोकांमध्ये होऊ लागल्याने मंगल कार्यालयात लागणारी स्टेजसजावट लागणाऱ्या फुलांची मागणी घटली आहे. तसेच मंदिराकडेही मोठ्या प्रमाणात भाविक फिरकत नसल्यामुळे पूजा करण्यासाठी फुलांचा वापर होत नाही. गावोगावच्या यात्रा जत्रा याही वर्षी साध्या पद्धतीने पार पडत आहे. त्यामुळे फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे चांगले उत्पादन येऊनही फुलांना चांगला भाव मिळेल ,अशी आशा बाळगणाऱ्या शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.
निमगाव खंडोबा (ता. खेड ) या परिसरात फुलांचे मळे बहरले आहेत मागणी नसल्याने फुलांची तोडणी होत नाही.