पुण्यात कोरोनामुळे कोमजलेला फुल बाजार गणेशोत्सवामुळे फुलला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 11:41 AM2020-08-21T11:41:46+5:302020-08-21T11:46:35+5:30
फुलांची आवक आणि ग्राहकांची गर्दी वाढली
पुणे : कोरोनाच्या संकटामुळे आणि लाॅकडाऊनमध्ये तीन महिने बंद असलेला फुल बाजार अनलाॅकमध्ये सुरू झाला. परंतु सर्व धार्मिक स्थळे व जाहिर कार्यक्रम बंद असल्याने फुलांना अपेक्षित मागणीच नव्हती. परंतु आता आपल्या लाडक्या बाप्पाच्या अगमनासाठी बाजार पेठा सज्ज झाल्या आहेत. यामुळेच फुलांना देखील मागणी वाढली असून, कोरोनामुळे कोमजलेला फुल बाजार चांगलाच फुलला आहे. गुरूवारी फुल बाजारात फुलांची आवक चांगलीच वाढली होती व ग्राहकांची देखील खरेदीसाठी गर्दी केली.
सध्या सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या अगमनास अवघे काही तास उरले आहेत. गणेशोत्सवामुळे मंदिराची सजावट, विविध प्रकारचे हार, माळा आदींसाठी ग्राहकांकडून फुलांना मोठी मागणी असते. त्यामुळेच मार्केटयार्डातील फुल बाजारात फुलांची आवक वाढली आहे. खरेदीसाठी विक्रेते आणि ग्राहकांची संख्या वाढली आहे. अचानक आवक वाढल्याने गुरूवारी फुलबाजार बहरला.
कोरोनामुळे मार्च, एप्रिल आणि मे जुन या महिन्यात फुलबाजार बंदच होता. मागील महिन्यांत फुल बाजार सुरू झाला आहे. मात्र शहरातील मंदिरे आणि धार्मिक स्थळे बंद असल्याने फुलांची आवक होत नव्हती. तसेच ग्राहकांकडूनही अधिकची मागणी होत नव्हती. मात्र गणेशोत्सवामुळे विविध प्रकारच्या फुलांची आवक वाढली आहे. खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडत असल्याची माहिती व्यापारी सागर भोसले यांनी दिली. फुलबाजारात कर्नाटक, सातारा, सोलापूर, बीड भागातून बाजारात झेंडूच्या फुलांची आवक झाली.
पुणे जिल्ह्यातून गुलाब, शेवंती, गुलछडी, अष्टर या फुलांची आवक झाली. कोरोनामुळे फुलांची आवक दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे. दरवर्षी गणेशोत्सवात फुलांची मोठी आवक होते. मात्र, फूल बाजाराचे कामकाज नियमित झाल्यानंतर पहिल्यांदाच काल फुलांची मोठी आवक झाली असल्याचेही भोसले यांनी नमुद केले. झेंडूच्या फुलांना ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. झेंडूच्या फुलांना प्रतवारीनुसार प्रतिकिलोला 100 ते 200 रुपये भाव मिळाला. शेवंतीला प्रतिकिलो 100 ते 200 रुपये, गुलछडीला 300 ते 400 रुपये भाव मिळाला. अष्टरच्या चार गड्ड्यांना 50 रुपये तसेच साध्या गुलाबाच्या गड्डीला 30 ते 60 रुपये आणि डच गुलाबाच्या गड्डीला 100 ते 160 रुपये भाव मिळाला. गौरी विसर्जनापर्यंत फुलांचे दर तेजीत राहणार असल्याचेही सागर भोसले यांनी सांगितले.