फ्लाॅवर, मटार, गवार, पडवळ, काकडीच्या दरात वाढ, दर सामान्य माणसाच्या आवाक्यात असावेत - गृहिणींचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 05:59 PM2021-03-14T17:59:27+5:302021-03-14T18:00:41+5:30
उन्हाचा चटका वाढल्याने उत्पादनात घट झाल्याचा परिणाम
उन्हाचा चटका वाढल्याने पिंपरी भाजी मंडईत भाज्यांचे उत्पादन कमी होऊन काही भाज्यांचे दर वाढले आहेत. त्यात फ्लाॅवर, मटार, गवार, पडवळ, काकडीच्या दरात वाढ झाली आहे. त्यावर हे दर सामान्यांच्या आवाक्यात असावेत. असे मत गृहिणींनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले आहे.
या आठवड्यात फ्लाॅवर, मटार, गवार तसेच पडवळ यांची आवक कमी झाली आहे. तसेच उन्हामुळे काकडीला मागणी वाढली आहे. परिणामी त्यांच्या दरात वाढ झाली आहे. मावळ तालुक्यातून काळ्या वांग्यांची आवक वाढली आहे. त्यात महिको वाग्यांचीही चांगली आवक आहे. त्यामुळे वांग्यांच्या दरात काहिसी घसरण झाली असून, वांगी सामान्यांच्या आवाक्यात आली आहेत.
पालेभाज्यांमध्ये मुळा व कांदापात प्रतिगड्डी १५ रुपये दर आहे. तर इतर सर्व भाज्या १० रुपये प्रतिगड्डी आहेत. सरसो (मोहरी), चंदनबटवा या उत्तरभारतीय भाज्यांना उन्हाळ्यामुळे मागणी नाही. तसेच त्यांचे उत्पादनही कमी झाले आहे. त्याचप्रमाणे लातूर येथील तुरीच्या शेंगांची आवकही मोठ्या प्रमाणात घटली आहे. शितपेयांमध्ये वापर होत असल्याने लिंबूला मागणी वाढली आहे. प्रतिशेकडा २५० ते ३०० रुपये दर लिंबूला मिळत आहे.
उन्हाळ्यात ज्या भाज्या आहारात वापरल्या जातात त्यांचे दर वाढले आहेत. ते दर आवाक्यात आले पाहिजेत. काकडी, बिट, लिंबूचेही दर कमी झाले पाहिजे. कोरोना महामारीमुळे सकस आहारावर भर देण्यात येत आहे.
- संगीता शिंदे, गृहिणी
ग्राहक घराजवळूनच भाजीपाला खरेदी करण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे मंडईत अपेक्षित गर्दी होत नाही. किरकोळ विक्रीला याचा फटका बसत आहे. कोरोनामुळे ही परिस्थिती ओढावत असून, भाजीपाल्याचे दर वाढू शकतात.
- गणेश दाैंडकर, विक्रेता, पिंपरी
फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो) :
बटाटे: २० ते २५, कांदे: ३० ते ३५, टोमॅटो: १० ते १२, गवार: ९० ते १००, सुरती गवार: ८०, दोडका: ५० ते ६०, घोसाळी: ५० ते ६०, लसूण: ८० ते १००, आले: ४०, भेंडी: ४० ते ५०, वांगी: २० ते ३०, काळी वांगी: २० ते २५, कोबी: १० ते १२, शेवगा: ४० ते ५०, काळी मिरची: ६०, हिरवी मिरची: ५०, शिमला मिरची: ५०, पडवळ: ६० ते ७०, दुधी भोपळा: ३० ते ३५, लाल भोपळा: २०, काकडी: ४०, चवळी: ५० ते ६०, काळा घेवडा: ६०, तोंडली: ४०, गाजर: ३०, वाल: ५० ते ६०, राजमा: ८०, मटार (वटाणा): ६०, कारली: ४०, पावटा: ६०, श्रावणी घेवडा: ४० ते ५०, बिट: ३०, फ्लॉवर: ४०, तुरीच्या शेंगा: ६०, कैरी (तोतापुरी): ६० ते ७०, कैरी (कर्नाटक): ८०, लिंबू (शेकडा): २५०.
पालेभाज्यांचे भाव (प्रति गड्डी) :
कोथिंबीर: १०, मेथी: १०, शेपू: १०, पालक: १०, मुळा: १५, तांदुळजा: १०, करडई: १०, आंबटचुका: १०, चवळी: १०, हिरवा माठ: १०, राजगीरा: १०, पुदिना: ५, आंबाडी: १०, कांदापात: १५, हरबरा: १०, गवती चहा: ८ ते १०, लालबिट: १०.