Pune Metro: पुणे मेट्रो पुलाच्या दोन खांबांमधील जागेत फुलणार फुलांचे ताटवे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 06:44 PM2022-03-24T18:44:28+5:302022-03-24T18:45:35+5:30
मेट्रोच्या दोन खांबांमधील रिकाम्या जागेचे तसेच स्थानकाच्या खाली असणाऱ्या खांबांचे सुशोभीकरण करण्यात येणार
पुणे : मेट्रोच्या दोन खांबांमधील रिकाम्या जागेचे तसेच स्थानकाच्या खाली असणाऱ्या खांबांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. खांबांमधील रिकाम्या जागेत फ्लॉवर बेड व स्थानकाच्या खाली असणाऱ्या खांबांवर व्हर्टीकल गार्डन तयार करण्यात येईल. खासगी कंपन्या, व्यापारी यांना व्यावसायिक तत्वावर ही जागा कराराने देऊन त्यांच्यावरच या कामाची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.
भूयारी मार्गाचे ५ किलोमीटर वगळता रस्त्याच्या वरून जाणाऱ्या संपूर्ण मेट्रो मार्गासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गावर सरासरी प्रत्येकी १ किलोमीटर अंतरावर मेट्रो स्थानक आहे. त्याखाली असणारी जागा प्रवाशांना स्थानकापर्यंत येण्यासाठी व स्थानकातून जाण्यासाठी म्हणून वापरण्यात येणाऱ्या बस, रिक्षा या वाहनांना स्थानक म्हणून वापरण्यात येणार आहे. त्यामुळे तिथे फ्लॉवर बेड नसतील, मात्र स्थानकाखाली असणारे सर्व खांब व्हर्टिकल गार्डनने सुशोभीत करण्यात येणार आहेत.
स्थानके वगळता अन्य मार्गांवर दोन खांबाच्या मध्यभागी पूर्वी रस्ता दुभाजक असायचे तशी साधारण ५ फूट इतकी जागा आहे. त्याच्या दोन्ही बाजू काँक्रिटच्या मोठ्या वीटा लावून बंदिस्त करण्यात आल्या आहेत. मधल्या जागेत माती टाकून त्यावर फुलांचे ताटवे तयार करण्यात येतील. त्यात्या परिसरात असणाऱ्या खासगी कंपन्या, व्यावसायिक यांना या जागा कराराने देण्यात येतील. त्यांनीच फुलांचे ताटवे तयार करून त्याची निगराणीही ठेवायची आहे. त्या बदल्यात त्यांना तिथे त्यांच्या उत्पादनाची विशिष्ट आकारात जाहिरात करता येईल. यातून संपूर्ण मेट्रो मार्ग वरून व खालूनही सुशोभीत दिसेल, त्यामुळे रस्त्याचे सौंदर्य वाढेल असे महामेट्रोकडून सांगण्यात आले.