आभाळातून पुष्पवर्षाव, मानवंदना
By admin | Published: March 28, 2017 02:06 AM2017-03-28T02:06:20+5:302017-03-28T02:06:20+5:30
धर्मवीर श्री छत्रपती संभाजीमहाराजांच्या ३२८ व्या बलिदानस्मरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे
कोरेगाव भीमा : धर्मवीर श्री छत्रपती संभाजीमहाराजांच्या ३२८ व्या बलिदानस्मरण दिनानिमित्त श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे आज राज्यभरातून आलेल्या शंभूभक्तांनी समाधीस्थळावर अलोट गर्दी केली होती. या वेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. शासकीय मानवंदनाही देण्यात आली.
सकाळी सात वाजता शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान यांनी मूक पदयात्रा काढली. त्यात पाच हजारांपेक्षा जास्त शंभूभक्त सहभागी झाले होते. सकाळी साडेअकरा वाजता मंत्रोच्चारात हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक यांच्या आदेशानुसार समाधीस्थळावर पोलिसांनी शासकीय मानवंंदना दिली. या वेळी संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ले पुरंदर ते श्रीक्षेत्र वढू बुद्रुक-तुळापूर असा पालखी सोहळा व शिरूर-हवेली प्रासादिक दिंडीच्या वतीने आपटी ते वढू बुद्रुक अशा पालखी सोहळ्याचे समाधीस्थळावर आगमन झाले. पुष्पवृष्टीनंतर झालेल्या वेळी महाराणा प्रताप यांचे २४ वे वंशज लोकेंद्रसिंह कळवा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, पीडीसीसी बँकेचे संचालक निवृत्ती गवारे, तेलंगणाचे आमदार राजसिंह ठाकूर, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, पंचायत समितीच्या उपसभापती मोनिका हरगुडे, सदस्या जयमाला जकाते, जगद्गुरू तुकोबाराय संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजीमहाराज मोरे, सरपंच रेखा शिवले, धर्मवीर संभाजीमहाराज स्मृती समितीचे मिलिंद एकबोटे आदी उपस्थित होते.
स्मृती समितीच्या वतीने धर्मवीर छत्रपती श्री संभाजीमहाराज शंभूसेवा पुरस्कार महाराणा प्रताप यांचे २४ वे वंशज रजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकेंद्रसिंह कळवा, शंभूभक्त अशोक भंडलकर पुरस्कार दुर्गमित्र सचिन टेकवडे, शंभूभक्त डी. डी. भंडारे पुरस्कार शिवदुर्ग संवर्धन संस्था व शंभूभक्त गेणू गणपत शिवले पुरस्कार मारुती तुपे यांना देण्यात आला.
लोकेंद्रसिंह कळवा म्हणाले, ‘‘महापुरुषांच्या पराक्रमाची इतिहासकारांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केल्याने आजही आपण खऱ्या इतिहासापासून वंचित राहिलो आहे. त्यामुळे प्रत्येक शंभूभक्ताने महापुरुषांच्या खऱ्या इतिहासापासून प्रेरणा घेण्याची गरज आहे. ’’
शिरूर-हवेली दिंडीच्या वतीने तुळापूर ते वढू पालखी, बंडातात्यांची व्यसनमुक्त दिंडी, गोदाकाठ दिंडी, सणसवाडी येथील भैरवनाथ प्रासादिक दिंडी यासह परिसरातून मोठ्या प्रमाणावर दिंडी आल्या होत्या. तलवारबाजीचे थरारक प्रात्यक्षिकही या वेळी सादर करण्यात आले. त्याला उपस्थितांची दाद मिळाली. अनेक ठिकाणांहून ज्योती, तसेच दिंड्या आणण्यात आल्या होत्या. (वार्ताहर)
भगव्या पताका : देहू संस्थानच्या दिंड्यांचे अभिवादन
देहू संस्थानच्या पालखी सोहळ्यातील दिंड्यांनी शंभूछत्रपतींच्या स्मारकावर नतमस्तक होण्यासाठी येण्याचे आवाहन संस्थानच्या वतीने केल्यानंतर त्यास प्रतिसाद म्हणून तब्बल ३० विविध दिंड्यांचे चालक, आपापल्या दिंड्या पताका घेऊन शंभूतीर्थावर नतमस्तक होऊन अभिवादन केले आहे. पुढील वर्षी संस्थानच्या सर्व दिंड्या शंभूतीर्थावर आणण्याचा मानस असल्याचे संस्थानचे माजी अध्यक्ष शिवाजीमहाराज मोरे यांनी सांगितले.
शंभूतीर्थ वढू बुद्रुकला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या : शिवले
शंभूछत्रपतींचे समाधीस्थळ श्रीक्षेत्र वढू बुद्रुक या ठिकाणी ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा असून तो ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शासनाने ‘ब’ वर्गाचा दर्जा देण्याची मागणी सरपंच रेखा शिवले यांनी केली.