Pune: तापमानातील चढ-उतारामुळे डेंग्यूसह व्हायरलचा ‘ताप’, झिकापेक्षा डेंग्यूचा धाेका अधिक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 02:37 PM2024-07-22T14:37:22+5:302024-07-22T14:38:04+5:30
घराेघरी काेणी ना काेणी आजारी पडल्याने संपूर्ण कुटुंबच डिस्टर्ब झाल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळतय
पुणे: वातावरणातील बदल अन् तापमानातील चढ-उतारामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाची रिपरिप, हवेतील आर्द्रता आणि त्यातच डासांचे वाढलेले प्रमाण आदी कारणांमुळे सध्या पुण्यात व्हायरल रुग्णांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे खासगीसह सरकारी दवाखान्यांमध्ये प्रचंड गर्दी हाेत आहे. घराेघरी काेणी ना काेणी आजारी पडल्याने संपूर्ण कुटुंबच डिस्टर्ब झाल्याचे चित्र शहरात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. आरोग्य विभाग सध्या झिकावर लक्ष ठेवून आहे. मात्र, त्या तुलनेत व्हायरलमुळे तापाने फणफणणारी रुग्ण संख्या प्रचंड वाढली आहे.
सध्या झिकाचे रुग्ण वाढत आहेत. त्याची चर्चा हाेत आहे. परंतु, त्याच्या कैकपटीने व्हायरल आणि डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत आहे. जुलै महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली असून या काळात विषाणूजन्य आजारांची संख्या वाढली आहे. यामध्ये ताप, खाेकला, घसादुखी, अंगदुखी या लक्षणांनी घरातील काेणी ना काेणी आजारी पडले. त्यांचा संसर्ग कुटुंबातील इतर सदस्यांनाही झाला असून काही ठिकाणी तर संपूर्ण घरच आजारी पडलेले दिसून येत आहे. याला लहान मुलेही अपवाद नाहीत. त्यामुळे मुलांच्या शाळेला दांड्या आणि माेठ्यांचीही कामावर गैरहजेरी पडत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून पुण्यात ढगाळ वातावरण आहे. अशा वातावरणात विषाणू आणि जीवाणूंची वाढ खूप जाेमाने हाेते. ऊन पडल्यावर वातावरणातील या विषाणू-जीवाणूंची संख्या कमी हाेते. परंतु, वातावरण आल्हाददायक असून मधूनच पावसाच्या सरी पडत आहेत. त्यामुळे वातावरणात गारवाही आलेला आहे. त्याचा परिणाम हा सर्वांवरच हाेताे आणि नागरिक आजारी पडतात. त्यातच थंड हवेचे प्रमाण वाढल्याने त्याचा सर्वाधिक प्रभाव हा मुले, वयाेवृद्ध यांच्यावर हाेताे. कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी असते.
डेंग्यूचे थैमान
शहरात रिपरिप पाऊस सुरू असल्याने पाणी साचून राहते. अशा ठिकाणी डास अंडी घालतात. त्यातून मोठ्या प्रमाणात डासांची पैदास हाेते. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या अनेक ठिकाणी डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे प्लेटलेटची संख्याही कमी हाेत आहे आणि त्यामुळे प्लेटलेटची मागणीही वाढली आहे.