Pune Crime | कळंब परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; चोर सीसीटीव्हीमध्ये कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 13:40 IST2023-03-17T13:36:04+5:302023-03-17T13:40:02+5:30
चोरट्यांच्या बुटाची एक जोडी आढळून आली आहे...

Pune Crime | कळंब परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; चोर सीसीटीव्हीमध्ये कैद
मंचर (पुणे) : कळंब परिसरात पहाटे चोरट्यांनी घरफोडी करून चोरीचा प्रयत्न केला. यावेळी श्रीस्वामी समर्थ केंद्रातील दानपेटी उचलून नेली आहे. चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून, चोरट्यांच्या बुटाची एक जोडी आढळून आली आहे.
रात्री सव्वा वाजताच्या दरम्यान चोरट्यांनी कळंब गावात प्रवेश केला. श्रीस्वामी समर्थ केंद्रातील दानपेटी मागील दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटी कटावणीने उचकटून उचलून नेली आहे. सदर ठिकाणी दुसरी दानपेटी न फुटल्याने ती तशीच सोडून चोरट्यांनी पळ काढला. जनार्दन कानडे आणि पांडुरंग भालेराव यांच्या बंद घराची कुलपे तोडून चोरीचा प्रयत्न केला. सदर ठिकाणी बंद घरे असल्याने हाताला मिळेल तो मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. या ठिकाणी एका अल्टो गाडीची चावी सापडली आहे. तसेच भूषण शिंदे यांची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली होती. परंतु, सकाळी ती एकलहरे या ठिकाणी आढळली.
कळंब परिसरात चोऱ्यांचे सत्र चालू झाल्यामुळे व्यापारी, नागरिकांमध्ये तसचे महिला वर्गामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. मयूर भालेराव यांच्या घराजवळ चोरट्यांच्या बुटाची एक जोडी आढळून आली आहे. गावामध्ये भविष्यात होणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी ग्रामसुरक्षा दल स्थापन करणे गरजेचे आहे, असे मत सरपंच उषा कानडे आणि उपसरपंच संतोष भालेराव यांनी यावेळी व्यक्त केले आहे. सदर घटनेची माहिती समजताच मंचर पोलिस रात्री ३ वाजता गस्तीवर आले. त्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे. गावातील मनोहर वर्पे, डॉ. बाळकृष्ण थोरात आणि श्रीस्वामी समर्थ केंद्र या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तीन चोरटे कैद झाले आहेत.