सर्व संस्कृतीत आढळणारे बासरी हे एकमेव वाद्य
By admin | Published: December 12, 2015 12:48 AM2015-12-12T00:48:00+5:302015-12-12T00:48:00+5:30
बासरी हे असे एकच वाद्य आहे जे जगात आणि सर्व संस्कृतीत आपल्याला आढळून येते. बासरीचे विविध प्रकार असूनही ती आजच्या सर्व संगीतप्रकारात वापरली जात आहे,
पुणे : बासरी हे असे एकच वाद्य आहे जे जगात आणि सर्व संस्कृतीत आपल्याला आढळून येते. बासरीचे विविध प्रकार असूनही ती आजच्या सर्व संगीतप्रकारात वापरली जात आहे, हे या वाद्याचे वैशिष्ट्य असल्याची भावना बासरीवादक प्रवीण गोडखिंडी यांनी व्यक्त केली.
भारतीय शास्त्रीय संगीत हे हृदयातून तर कर्नाटकी संगीत हे तालावर भर देत वाजविले जाते, असे मतही त्यांनी नोंदविले.
६३ व्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात होत असलेल्या ‘अंतरंग’ या कार्यक्रमादरम्यान शुक्रवारी गोडखिंडी यांची मुलाखत आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
बासरीचा प्रवास समजावून सांगताना भगवान श्रीकृष्णापासून ते पं. पन्नालाल घोष आणि आता हरिप्रसाद चौरसिया यांच्याविषयीही गोडखिंडी भरभरून बोलले.
पं. पन्नालाल यांनी बासरी शास्त्रीय संगीतात आणली तर हरिप्रसाद चौरसिया यांनी ती वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली, असे गोडखिंडी म्हणाले.
लहानपणापासूनच पं. भीमसेन जोशी यांना ऐकत आल्याने ‘नेहमी बासरीमधून गाण्याचा प्रयत्न कर’ ही आपले वडील व गुरू व्यंकटेश गोडखिंडी म्हणायचे.
वडिलांनी सांगितलेली ही गोष्ट लक्षात ठेवत आजपर्यंत बासरी वाजवीत आहे, अशी आठवण सांगत प्रवीण गोडखिंडी यांनी आजपर्यंतचा आपला सर्व प्रवास वडील व्यंकटेश गोडखिंडी व भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना समर्पित केला.
(प्रतिनिधी)