लोकलमध्ये हुल्लडबाजांचा स्टंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 03:52 AM2017-07-19T03:52:18+5:302017-07-19T03:52:18+5:30
सुरक्षिततेबाबत केवळ घोषणा केल्या जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वानवा, लोकलमध्ये हुल्लडबाजी, प्रथम श्रेणीच्या डब्यात सामान्य प्रवाशांचे
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : सुरक्षिततेबाबत केवळ घोषणा केल्या जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची वानवा, लोकलमध्ये हुल्लडबाजी, प्रथम श्रेणीच्या डब्यात सामान्य प्रवाशांचे अतिक्रमण, सुरक्षेसाठी असणारे पोलीस गायब अशी स्थिती पिंपरी ते देहूरोड आणि देहूरोड ते पिंपरी लोकल प्रवासात दिसून आली.
पिंपरी-चिंचवड शहरातील लोकलचा प्रवास कितपत सुरक्षित व सोईस्कर आहे, याबाबतचा आढावा ‘लोकमत टीम’कडून घेण्यात आला. यामध्ये रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षिततेबाबतच्या केवळ घोषणाच होत असल्याचे दिसून आले. महिला व प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्थानकावरील पोलीस कक्ष सतर्क राहण्यासह स्थानकावर पोलिसांची गस्त असणे अपेक्षित आहे. मात्र, सोमवारी सायंकाळी गर्दीच्या वेळी केलेल्या प्रवासात ना पोलिसांकडून सतर्कता दिसली, ना गस्तीवरील पोलीस नजरेस पडले.
सोमवारी सायंकाळी पिंपरी येथून ५.४७च्या लोकलने प्रवासाला सुरुवात केली. या ठिकाणी कोठेही सीसीटीव्ही कॅमेरे दिसून आले नाहीत. यासह सायंकाळची वेळ असल्याने चाकरमान्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. सामान्य डबे फुल्ल असतानाच सामान्य डब्याच्या तिकिटावरच प्रथम श्रेणीच्या डब्यात कब्जा केलेल्यांची संख्याही अधिक होती.
प्रवाशांची कसरत
सायंकाळच्या वेळी लोकलला मोठ्या प्रमाणात गर्दी असते. लोकलमध्ये चढताना-उतरताना प्रवाशांना कसरत करावी लागते. मात्र, अशातच हुल्लडबाज तरुण स्टंटबाजी करीत गोंधळ घालत असल्याचे दिसून आले. सोमवारी सायंकाळी ६.३५ ला पिंपरीहून पुण्याच्या दिशेने लोकल निघाली असता पाच हुल्लडबाज तरुणांचे टोळके लोकलमध्ये
शिरले. आतमध्ये बसण्यास जागा असतानाही दरवाजात उभे
राहून शिट्या मारणे, बाहेर लटकणे, लोकल वेग घेत असतानाच खाली उतरून पुन्हा लोकलमध्ये चढणे असे स्टंट सुरू होते.
गस्त वाढण्याची आवश्यकता
गैरप्रकार रोखण्यासाठी स्थानकासह लोकलमध्येही पोलिसांची गस्त आवश्यक असताना सोमवारी केलेल्या पाहणीमध्ये कोठेही पोलीस नजरेस पडले नाहीत. त्यामुळे एखादी घटना घडल्यावरच पोलीस दिसणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सर्वसाधारण तिकिटावर प्रथम श्रेणीतून प्रवास
सामान्य डब्याचे तिकीट असताना प्रथम श्रेणीच्या डब्यात अनेकजण शिरतात. अशाच प्रकारे सोमवारी पिंपरीहून देहूरोडला जात असताना तिघा जणांचे एक टोळके लोकलमध्ये शिरले. तिघांपैकी एकजण इतर दोघांना म्हणत होता की आपण प्रथम श्रेणीच्या डब्यात आलो आहोत. दुसऱ्या डब्यात जाऊ नाहीतर तिकीट तपासणीस पकडतील. त्यावर अन्य दोघांनी त्याला गप्प केले. ‘गेले सात महिने झाले, आम्ही सामान्य डब्याच्या तिकिटावर प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करीत आहोत. अद्यापपर्यंत कोणीही विचारणा केलेली नाही. तू पण बस; कोणी काहीही करीत नाही’ असे म्हणत तिघेही प्रथम श्रेणीच्या डब्यात निवांत बसले.
स्थानकाच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष
सोमवारी सायंकाळी ६.०४ च्या लोकलने देहूरोडहून पिंपरीकडे येत असताना प्रथम श्रेणीच्या डब्यात एक भिकारी प्रवेश मार्गातच निवांतपणे खाली झोपला होता. उभे राहण्यासह जागा नसताना झोपलेला व्यक्ती मात्र उठण्यास तयार नव्हता. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला.
स्थानकावर घडणारे गैरप्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होत असतात. त्यामुळे तपास कार्यात मोठा फायदा होतो. मात्र, पिंपरी, देहूरोड या महत्त्वाच्या स्थानकांसह इतर स्थानकांवरही सीसीटीव्ही कॅमेरे दिसून आले नाही. सुरक्षिततेबाबत केवळ घोषणा केल्या जातात. त्यासाठी आवश्यक साधनांकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.