रब्बी आवर्तनावर भरारी पथकाची ‘नजर’
By admin | Published: November 20, 2015 02:45 AM2015-11-20T02:45:45+5:302015-11-20T02:45:45+5:30
नीरा डावा कालव्यातून १४ नोव्हेंबरपासून रब्बी आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र, अल्प पर्जन्यमानामुळे वीर, भाटघर धरणातील पाणीपातळी कमालीची घटली आहे.
बारामती : नीरा डावा कालव्यातून १४ नोव्हेंबरपासून रब्बी आवर्तन सोडण्यात आले आहे. मात्र, अल्प पर्जन्यमानामुळे वीर, भाटघर धरणातील पाणीपातळी कमालीची घटली आहे. यामुळे या आवर्तनाावर पाटबंधारे विभागाने कडक नियंत्रण ठेवण्याचे ठरविले असून भरारी पथकाची ‘नजर’ ठेवण्यात येणार आहे. जुलैै २०१६ अखेर पिण्यासाठी व मंजूर औद्योगिक वापरासाठी पाणी राखून नियोजन करण्यात आले आहे.
पाणीचोरी करणाऱ्या शेतकऱ्यांवर सुरुवातीपासून नजर ठेवण्यात येणार आहे. चोरून पाणी घेणाऱ्या शेतकऱ्यांना सुरुवातीला समज देण्यात आली आहे. कालवा निरीक्षक, पाटकरी यांच्यामार्फत समज देण्यात आली आहे. गरज भासल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे. उपविभागीय अधिकारी अप्पासाहेब भोसले, शाखाधिकारी शंकरराव चौलंग आदींचा भरारी पथकामध्ये समावेश आहे. कालव्यात पाणी सोडण्यापूर्वी भरारी पथकाने पाहणी करून सायफन काढले आहेत. पिण्याचे पाणी महिन्यातून तीन दिवस पोलीस बंदोबस्तात सोडण्यात येणार आहे. नीरा-डावा कालव्यावर बारामती शहरासह १० मोठ्या पाणीपुरवठा योजना अवलंबून असल्याचे पाटबंधारे खात्याचे उपविभागीय अधिकारी भोसले, शाखा अधिकारी चौलंग यांनी सांगितले.
या आवर्तनानंतर १ एप्रिल २०१६ ला उन्हाळी आवर्तन देण्यात येणार आहे.
मात्र, या आवर्तनाचा कालावधी
उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून
आहेत. (वार्ताहर)
इंदापूरच्या २२ गावांंना लवकर पाणी द्या!
वितरिका क्रमांक ४९, ५७, ५४ मोठ्या आहेत. त्यामुळे येथील क्षेत्र भिजण्यासदेखील वेळ जातो. परिणामी, या परिसरातून इंदापूर तालुक्यातील २२ गावांना नेहमी उशिरा पाणी मिळते. तोपर्यंत पिके जळून जातात. धरणात पाणीपातळी भरपूर आहे. ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा धरणात आहे. त्यामुळे २२ गावांतील शेतकऱ्यांना लवकरात लवकर पाणी द्यावे, अशी मागणी शेतकरी संघर्ष कृती समितीचे नेते सूर्यकांत रणवरे यांनी केली आहे.