धायरी फाटा येथील उड्डाणपुल सुस्थितीतच ; महापालिकेचे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 08:31 PM2019-07-10T20:31:03+5:302019-07-10T20:32:46+5:30
पुण्यातील धायरी फाटा येथील उड्डाणपुलाला तडे गेल्याचा फाेटाे साेशल मीडियावर व्हायरल हाेत हाेता. प्रत्यक्षात ही अफवा असल्याचे पुणे महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे : धायरी फाटा येथील उड्डाणपुलाला छेद गेला असून ताे धाेकादायक झाला असल्याचे अनेक मेसेजेस साेशल मीडियावर फिरत हाेते. त्यावर महापालिकेने स्पष्टीकरण दिले असून धायरी फाटा येथील उड्डाणपुलाला कुठलाही धाेका नसून पूल सुस्थितीत असल्याचे सांगण्यात आले आहे.
धायरी फाटा येथील उड्डाणपुलाला जाॅईंटच्या इथे तडे गेले असून ताे धाेकादायक झाला असल्याचा संदेश आज सकाळपासून साेशल मीडियावर व्हायरल हाेत हाेता. व्हाॅट्सअपवर उड्डाणपुलाला तडा गेला आहे असे म्हणत एक फाेटाे व्हायरल करण्यात आला हाेता. प्रत्यक्षात ती उड्डाणपुलाच्या दाेन्ही जाॅईंट मधील माेकळी जागा असून ती पुलाच्या निर्मितीतील एक तांत्रिक बाब असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे साेशल मीडियावर फिरणारा संदेश ही एक अफवा असून त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे.
पालिकेने प्रसिद्धिपत्रकात म्हंटल्याप्रमाणे धायरी फाटा येथील उड्डाणपुलासंदर्भात दाेन्ही जाॅईंटमधील अल्पशा माेकळ्या जागेबाबत साेशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित केली जात आहे. उड्डाणपुलाच्या जाॅईंटमधील माेकळी जागा ही पुलाच्या कामातीलच एक भाग आहे. त्यामुळे धायरी फाटा येथील उड्डाणपूल सुस्थितीतच आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.