उड्डाणपूलच पार्किंगच्या विळख्यात , मगरपट्टा, हडपसरमधील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 04:32 AM2017-11-28T04:32:20+5:302017-11-28T04:32:31+5:30
हडपसरमधील वाहतूककोंडी कमी व्हावी, यासाठी उड्डाणपूल बांधण्यात आले असले, तरी पोलीस आणि महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे हे उड्डाणपूलच अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात सापडले आहेत. महापालिका आणि वाहतूक पोलीस
हडपसर : हडपसरमधील वाहतूककोंडी कमी व्हावी, यासाठी उड्डाणपूल बांधण्यात आले असले, तरी पोलीस आणि महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे हे उड्डाणपूलच अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंगच्या विळख्यात सापडले आहेत. महापालिका आणि वाहतूक पोलीस विभागामध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे मगरपट्टा चौक आणि हडपसर उड्डाणपुलांखाली सुरू असलेले उद्योग जोरात आहेत. टेम्पो, रिक्षा व इतर व्यावसायिक वाहने आणि पीएमपी बसेच तसेच हातगाडी विक्रेत्यांचे अतिक्रमण उड्डाणपुलांखाली असून, हे अनधिकृत पार्किंग वेळीच थांबविले जावेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
मगरपट्टा चौक आणि हडपसर गाडीतळ येथील उड्डाणपुलांखाली छोटे-मोठे टेम्पो व रिक्षांच्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वाहतूक खोळंबण्याचे प्रकार सातत्याने घडतात.
मगरपट्टा चौकात उड्डाणपुलाच्या बाजूला असलेले रस्ते अरुंद आहेत. त्यातच उड्डाणपुलाखील टेम्पो , रिक्षा अचानकपणे वाहनांपुढे येतात. त्यामुळे वाहतूक खोळंबते व अपघातही घडतात.
लाखो रुपये खर्च करून हडपसर उड्डाणपुलाखालून बीआरटीचा मार्ग केला आहे. त्या मार्गाच्या बाजूने अनधिकृत रिक्षा, सहाआसनी रिक्षा आणि टेम्पो ही वाहने लावली जातात. तसेच पुलाशेजारील व्यावसायिकांची चारचाकी वाहनेही याच ठिकाणी लावलेली असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तरीही, महापालिका प्रशासन किंंवा पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही. उड्डाणपुलाखाली अनधिकृत वाहनतळांवर कारवाई केली नाही, तर हा प्रश्न अधिक व्यापक होईल, याकडे येथील जाणकार नागरिकांनी लक्ष वेधले आहे.
हडपसर उड्डाणपुलाखाली कामधेनू इस्टेट, रामानंद कॉम्लेक्स, अग्रवाल स्वीट होम आणि पीएमपी बिल्डिंगसमोरील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना तसेच उड्डाणपुलाखाली छोटे-मोठे टेम्पो रात्रंदिवस अनधिकृतपणे पार्किंग केले जातात. बंटर शाळेच्या बाजूकडील पुलाखाली रिक्षा आणि पीएमपी थांबत असल्याने वाहतूक खोळंबण्याचे प्रकार सातत्याने घडतात. उड्डाणपुलाखालील या टेम्पोच्या अनधिकृत वाहनतळामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
येथील रुग्णालयात किंवा मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना पाच-दहा मिंनिटेही त्यांचे दुचाकी किंंवा चारचाकी वाहन या टेम्पोचालकांकडून पार्किंग करून दिले जात नाही. या अनधिकृत पार्किंगमुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र, महापालिका आणि वाहतूक पोलिसांकडून अनधिकृत वाहनतळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होते आहे.