ही परदेशातली नदी नाही बरं का आपली मुळा मुठाच आहे!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 02:03 PM2019-12-21T14:03:22+5:302019-12-21T14:13:50+5:30
सांडपाण्यामुळे मुळा-मुठा नदीमध्ये फेस : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
लोणी काळभोर : पावसाने या वर्षी लावलेल्या दमदार हजेरीमुळे मुळा- मुठेला अनेकदा पूर आला. यामुळे नदीतील जलपर्णी, घाण आणि दूषित पाणी वाहून गेले. यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांत आनंदाचे वातावरण होते. मात्र, पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील रसायने आणि मैलायुक्त दूषित पाणी पुन्हा नदीत आल्याने या दोन्ही नद्यांचे पाणी पुन्हा दूषित झाले आहे.
ज्या गावची नदी स्वच्छ, त्या गावाचे आरोग्य चांगले, असे आयुर्वेदात सांगितले आहे. मुळा-मुठा नदी हीसुद्धा त्याला अपवाद नाही. पानशेत पुरानंतर नदीचे पाणी आसपासच्या भागात कुठवर जाते, याची कल्पना आल्यानंतर किमान तो भाग मोकळा करणे पालिकेला शक्य होते. तेथील सर्व बेकायदा अतिक्रमणे हटवणेही गरजेचे असताना तसे घडले नाही. उलट, तेथील वस्त्या आहे तिथेच राहिल्या. नदीत बांधकामांचा राडारोडा टाकणाऱ्यांचे प्रमाणही वाढत गेले. त्यावर कोणाचाच वचक राहिलेला नाही.
मध्यंतरी नदीपात्रातून जाणाऱ्या रस्त्याला राष्ट्रीय हरित लवादाने आक्षेप घेतल्यावर तो काढून टाकावा लागला. याच लवादाने आता मुठा नदीकाठी असणाऱ्या डीपी रस्त्यावरील बांधकामे पाडण्याचा आदेश दिल्यामुळे पुणे महापालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभागाला त्याची दखल घ्यावी लागली आहे. न्यायालयाचा बडगा आल्याशिवाय आपल्याकडे कोणतेही काम सरकारी पातळीवर होत नाही, हा अनुभव आजच्या स्मार्ट सिटीच्या काळातही येत आहे.
कोणत्याही शहरातून वाहणारी नदी ही केवळ त्या शहराची जीवनवाहिनी नाही, तर आरोग्याचे रक्षण करणारी सरिता समजली जाते. कारण, मुळा-मुठा नदीचे गटारगंगेत झालेले रूपांतर हे पुणे शहर व नदीनजीकच्या गावांतील नागरिकांच्या आरोग्याबाबतच्या वाढत्या तक्रारींमागील एक महत्त्वाचे कारण आहे, हे सिद्ध झाले आहे. या नदीकडे गेल्या पाच-साडेपाच दशकांत दुर्लक्ष झाले असल्यामुळे तिची व तिच्या आसपासची परिस्थिती बिकट झाली आहे. मैलायुक्त पाणी शिरल्यामुळे नदीतील अनेक जलचर प्रजाती नष्ट झाल्या आहेत.
....
उजनी धरणातही दूषित पाणी
पुणे महापालिकेच्या वतीने ९ ठिकाणी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रे उभारली आहेत. परंतु, ती नावालाच असल्याने पाणी जसेच्या तसे नदीत येते. ग्रामीण भागातील शेतकरी याच पाण्याचा उपयोग शेतीसाठी करतात. पुढे हेच पाणी उजनी धरणातून थेट सोलापूर जिल्ह्यात जाते.
..........
नदीतीरावर असलेल्या गावांतील नागरिक हे पाणी पिण्यासाठी वापरतात. यामुळे त्यांना काहीच दोष नसताना गॅस्ट्रो, विषमज्वर, कॉलरा इत्यादी आजारांसह पोटाच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते.
3यामुळे ‘पिंपरी-चिंचवड व पुण्याच्या चुकांची शिक्षा आम्ही का भोगायची?’ असा सवाल ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांचा आहे.
...