सायकल चोरणाराच ठेवणार सायकलींवर लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 02:59 AM2018-11-01T02:59:59+5:302018-11-01T03:00:15+5:30
लॉक तोडलेली सायकल घेऊन जाणाराच आता त्याच सायकलींचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सायकल शेअरिंग योजनेला तो तरुण आता मदत करीत असून त्याचे मित्रदेखील त्याच्यासोबत आले आहेत.
पुणे : लॉक तोडलेली सायकल घेऊन जाणाराच आता त्याच सायकलींचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सायकल शेअरिंग योजनेला तो तरुण आता मदत करीत असून त्याचे मित्रदेखील त्याच्यासोबत आले आहेत. त्यामुळे ही घटना सायकल शेअरिंग योजनेला बळ देणारी ठरत आहे.
शहरात सायकल शेअरिंग योजना गेल्या वर्षी सुरू झाली. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, काही ठिकाणी लहान मुले मात्र सायकलींच्या चोऱ्या करून तोडफोड करीत आहेत. सायकल कंपनीचे काही प्रतिनिधी सर्व शहरांत नजर ठेवून आहेत. या प्रतिनिधींना येरवड्यात एक १८ वर्षांचा तरुण लॉक नसलेली सायकल घेऊन जाताना दिसला. तेव्हा त्यांनी त्याला पकडले आणि पर्णकुटी पोलीस चौकीमध्ये पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दम दिल्यानंतर त्या तरुणाने ही सायकल कल्याणीनगर येथून आणल्याचे कबूल केले. यानंतर सायकल कंपनीकडून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु, त्या तरुणाविषयीची सर्व माहिती जाणून घेतल्यानंतर हे प्रकरण सामोपचाराने मिटविण्याचा निर्णय सायकल कंपनीच्या प्रतिनिधीने घेतला. तो तरुण अपंग असून, एका महाविद्यालयात शिक्षण घेतो. त्याची आई घरकाम करते. त्याच्या वडिलांचे निधन झालेले आहे. त्यामुळे घरात तो आणि आई राहतात. ही परिस्थिती जाणून घेतल्यानंतर त्या तरुणाला समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. तसेच संबंधित तरुणाच्या आईने व मित्रांनीदेखील त्याच्यावर गुन्हा दाखल करू नये, अशी विनंती केली. कारण त्याच्या भविष्याचा प्रशन होता. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही. परंतु, त्या तरुणाकडून यापुढे असे प्रकार होणार नाहीत, असे लिहून घेतले. तसेच त्या तरुणाने सायकल कंपनीला मदत करण्याचे आश्वासन दिले.
येरवडा परिसरात कुठे कोण सायकली घेऊन जाते, कोण तोडफोड करतात, याविषयीची माहिती तो देणार आहे. तसेच नियमितपणे परिसरातील सायकलींचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेणार आहे. तसेच त्याच्या या कामात त्याचे मित्रदेखील सहभागी
झाले आहेत.
शहरात सायकलींची तोडफोड किंवा लॉक तोडल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येत आहे. तसेच जे तरुण आम्हाला सायकल शेअरिंग योजनेला मदत करतील, त्यांच्या परिसरातील सायकलींवर नजर ठेवतील, त्याबाबत माहिती देतील त्यांना आम्ही एक गुडी बॅग आणि महिनाभर सायकल चालविण्याचा पास देणार आहोत.
- आदर्श केदारी,
आॅपरेशन हेड, मोबाईक कंपनी