फेररचना, आरक्षणाकडे लक्ष!
By admin | Published: August 20, 2016 05:18 AM2016-08-20T05:18:10+5:302016-08-20T05:18:10+5:30
फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अखेर गट-गणांची रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हाधिकारी ९ सप्टेंबर
पुणे : फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अखेर गट-गणांची रचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जिल्हाधिकारी ९ सप्टेंबर रोजी आरक्षणासह प्रारूप प्रभाग रचना जाहीर करणार असून, हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनंतर जिल्हाधिकारी २५ नोव्हेंबर २०१६ रोजी अंतिम गट-गण रचना जाहीर करणार आहेत. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
राज्यातील २६ जिल्हा परिषदा आणि तब्बल २९७ पंचायत समितींच्या निवडणुका सन २०१७ मध्ये होणार आहे. यामध्ये पुणे जिल्हा परिषद व १३ पंचायत समितींसाठी फेबु्रवारी-मार्चमध्ये निवडणूक होणार आहे. या वेळी सन २०११ च्या जनगणनेनुसार निवडणुका होणार असल्याने गट-गणांची फेररचना करण्यात येणार आहे. गेल्या दहा वर्षांत लोकसंख्येत मोठी वाढ झाली असून, नव्याने अस्तित्वात आलेल्या नगरपरिषदांमुळे जिल्हा परिषदेच्या गट-गणांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यामुळे नव्याने होणाऱ्या गट-गणांच्या रचनेकडे इच्छुकांसह सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. गट-गणांचे आरक्षण जाहीर करताना चक्रानुक्रमे फिरविण्यात येणार आहे. यामध्ये फेररचनेमध्ये गट-गणांमध्ये बदल झाला तरी आरक्षण टाकताना सन २००२, २००७ आणि सन २०१२ चे आरक्षण गृहीत धरून या वेळचे आरक्षण फिरविण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
सॅटेलाइट व गुगल
मॅपचा वापर करून
होणार फेररचना
गट-गणांची फेररचना करताना सीमारेषा निश्चित करण्यासाठी या वेळी प्रथमच गुगल मॅप व सॅटेलाइटचा वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १० नगर परिषदांची प्रभागरचना निश्चित करताना याचा उपयोग करण्यात आला. गुगल मॅपचा वापर केल्याने या प्रभागरचना तंतोतंत करण्यासाठी प्रशासनाला मदत झाली. याच धर्तीवर आता गट-गणांची फेररचना करण्यात येणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले.
जिल्हा परिषद व १३ पंचायत समितीच्या गट-गणांच्या
फेररचना व आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
९ सप्टेंबर २०१६ : प्रारूप प्रभागरचना जाहीर करणे.
२३ सप्टेंबर २०१६ : प्रारूप प्रभागरचनेच्या प्रस्तावाला विभागीय आयुक्तांची
मान्यता घेणे.
२८ सप्टेंबर : आरक्षण सोडतीची सूचना प्रसिद्ध करणे.
५ आॅक्टोबर : प्रत्यक्ष आरक्षण सोडत काढणे.
१० आॅक्टोबर : प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे.
२० आॅक्टोबर : आरक्षण व फेररचनेबाबत हरकती व सूचना सादर करणे.
१७ नोव्हेंबर : हरकती व सूचनांवर सुनावणी घेणे-
२५ नोव्हेंबर : अंतिम गट-गणांची प्रभागरचना व आरक्षणे जाहीर करणे.