लोककला विद्यापीठाला मिळेना अद्याप मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:51 PM2019-02-25T23:51:47+5:302019-02-25T23:51:52+5:30

महाराष्ट्राला समृद्ध लोककलांचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या लोककला, लोकभूमिका, लोकगीते, लोकसाहित्य या सर्वांच्या मिलाफातून लोकसंस्कृती उभी राहिली आहे.

Folk art is still available in the university | लोककला विद्यापीठाला मिळेना अद्याप मुहूर्त

लोककला विद्यापीठाला मिळेना अद्याप मुहूर्त

Next

- प्रज्ञा केळकर-सिंग


पुणे : लोककलांच्या जतन, संवर्धन आणि विकासासाठी लोककला विद्यापीठ स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी चार वर्षांपूर्वी केली होती. लोककलावंतांची तसेच जाणकारांची समिती स्थापन करुन याबाबतचा अहवालही तयार करण्यात आला होता. मात्र, चार वर्षांनंतरही लोककला विद्यापीठ स्थापनेला अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. कला केंद्र अथवा अध्यासनाच्या माध्यमातून शासन दुधाची तहान ताकावर भागवत असल्याची तीव्र नाराजी लोककलावंतांकडून  दवण्यात
येत आहे.


महाराष्ट्राला समृद्ध लोककलांचा वारसा लाभला आहे. महाराष्ट्राच्या लोककला, लोकभूमिका, लोकगीते, लोकसाहित्य या सर्वांच्या मिलाफातून लोकसंस्कृती उभी राहिली आहे. लोककलांनी प्राचीन काळापासून लोकानुरंजनाचे, प्रबोधनाचे कार्य केले. काळ बदललला, मनोरंजनाची साधने बदलली आणि लोककला लोप पावण्याची भीती निर्माण झाली. लोककला जपल्या जाव्यात, त्यांचा विकास व्हावा, यासाठी लोककलावंत आपापल्या क्षमतेप्रमाणे झटत आहेत. मात्र, शासनाच्या माध्यमातून प्रयत्न झाल्यास आणि लोककला विद्यापीठ उभे राहिल्यास भविष्यात या कलांचे जतन आणि संवर्धन होऊ शकेल.


सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर शाहीर अमर शेख जन्मशताब्दी वर्षानिमित्त लोककला विद्यापीठाचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची घोषण २०१५ साली केली होती. लोककला विद्यापीठाचे स्वरुप, अभ्यासक्रम, योग्य व्यक्तींची नेमणूक याबाबतचा प्रस्ताव लोककलावंतांच्या समितीतर्फे सांस्कृतिक विभागाकडे सुपूर्त करण्यात आला होता. मात्र, चार वर्षे उलटून गेल्यानंतरही शासनातर्फे कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय लोककला संमेलनामध्ये संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी शासनाला याबाबतची आठवणही करुन दिली होती. महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमातही याबाबतचा ठराव मांडण्यात आला.


‘लोकमत’शी बोलताना दादा पासलकर म्हणाले, ‘लोककला विद्यापीठाच्या कार्यक्रमाबाबतचा प्रस्ताव सांस्कृतिक मंत्र्यांकडे सुपूर्त करण्यात आला होता. विद्यापीठाचा अभ्यासक्रम ठरवण्यासाठी लोककलावंतांच्या समिती गठित करावी, विद्यापीठावर योग्य
व्यक्तीची नेमणूक व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यापीठामध्ये प्रवेशासाठी किमान दहावी उत्तीर्ण अशी शिथिल अट ठेवावी. शिक्षकांची नेमणूक करताना पदवीधर किंवा डॉक्टरेटप्राप्त व्यक्ती असावी असा आग्रह न धरता प्रत्यक्ष अनुभव असलेल्या  ककलावंतांना
प्राधान्य मिळणे आवश्यक आहे. लोककला हा पुस्तकातून शिकण्याचा विषय नसून, प्रत्यक्ष अनुभवण्याचा विषय आहे.’
 

सांस्कृतिक विभागाने लोककलांबाबत गांभीर्याने विचार करणे आणि त्यादृष्टीने कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. आमच्या मागण्यांचा केवळ गाजराच्या पुंगीसारखा वापर केला तर लोककला टिकणार कशा? महाराष्ट्रभर लोककलेचे जागरण करणा-या व्यक्ती आहेत. लोककलांचे संवर्धन व्हावे यासाठी समाजाची, शासनाची आणि माध्यमांची साथ गरजेची आहे.
- शाहीर दादा पासलकर

सर्व लोककला या लोकाभिमुख आहेत. त्यामुळे लोककलावंत हे लोकपीठ आहेत. त्यांचा शरीरभाव मनोरंजनाचा असला तरी, आत्मा प्रबोधनाचा आहे. लोककलावंत ही विशारद पदवी मिळाली पाहिजे. कारण, लोककला आणि मराठी भाषा यामुळे आपण नटलो आहोत. पण, आपण लोकपरंपरा विसरत आहोत. लोककलेचा आत्मा प्रबोधनाचा असल्यामुळे ती टिकविण्याची
जबाबदारी आपली सर्वांची आहे. त्यासाठी लोककला विद्यापीठाची नितांत गरज आहे. - डॉ. रामचंद्र देखणे,
संत साहित्याचे अभ्यासक

Web Title: Folk art is still available in the university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.