कुकडेश्वर मंदिराच्या कळसासाठी ५ कोटींच्या निधीसाठी पाठपुरावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:34+5:302021-07-16T04:08:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जुन्नर : आदिवासी भागातील पूर येथील श्री क्षेत्र कुकडेश्वर मंदिराचा कळस उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जुन्नर : आदिवासी भागातील पूर येथील श्री क्षेत्र कुकडेश्वर मंदिराचा कळस उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकारात्मक आहेत. या कामासाठी राज्य शासनाच्या प्राचीन मंदिरांचे जतन व संवर्धन योजनेतून ५ कोटींचा निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा केला आहे, अशी माहिती शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
आदिवासी बांधवांचे श्रद्धास्थान असलेल्या जुन्नर तालुक्यातील पूर येथील श्री क्षेत्र कुकडेश्वर मंदिराचा कळस उभारण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आग्रही मागणी केली होती. त्यास मुख्यमंत्र्यांनी तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देत राज्याच्या मुख्य सचिवांना कार्यवाहीचे आदेश देत या कामासाठी किमान पाच कोटी रुपयांची तरतूद करणार असल्याचे स्पष्ट केले होते, असे आढळराव पाटील यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र शासनाचे पुरातत्व विभाग पुणे सहायक संचालक विलास वाहने, जिल्हाप्रमुख आमदार शरद सोनवणे, जुन्नरच्या आदिवासी भागातील लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमवेत बैठक झाली होती. बैठकीत ठरल्यानुसार हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्याचे पुरातत्त्व विभागाचे संचालक गर्गे यांना सादर करण्यात आला. डॉ. गर्गे यांनी मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार श्री क्षेत्र कुकडेश्वर मंदिराचा कळस उभारण्यासाठी अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याकामी प्रस्ताव मंजुरीसाठी सादर केल्यानंतर त्यास राज्य शासनाची मंजुरी मिळणार असल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.