वाढत्या कोरोनामुळे स्वयंशिस्त पाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:16 AM2021-02-26T04:16:42+5:302021-02-26T04:16:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नीरा : नीरा (ता. पुरंदर) येथील व्यापाऱ्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही निर्बंध आणण्याची वेळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नीरा : नीरा (ता. पुरंदर) येथील व्यापाऱ्यांनी कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी काही निर्बंध आणण्याची वेळ आणू नये, तसेच, कोरोना नियमांचे पालन करून नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी स्वयंशिस्त पाळावी, असे आवाहन नीरेचे उपसरपंच राजेश काकडे यांनी केले.
नीरा (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत कार्यालयात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ, व्यापारी यांची विचार विनिमय सभा गुरूवारी आयोजित करण्यात आली होती. या वेळी उपसरपंंच राजेश काकडे बोलत होते. यावेळी सरपंच तेजश्री काकडे, विराज काकडे, ग्रा.पं.सदस्य अभिषेक भालेराव, संदीप धायगुडे, अनंता शिंदे, सारिका काकडे, वैशाली काळे, जबीन डांगे, माधुरी वाडेकर, अनिल चव्हाण, नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य धारूरकर, डॉ. सागर डांगे, नीरा पोलीस दूरक्षेत्राचे फौजदार कैलास गोतपागर व ग्रामस्थ उपस्थित होते.
राजेश काकडे म्हणाले की, नीरा गावातील व्यापारी व ग्रामस्थांमध्ये बंदबाबत गैरसमज आहेत ते चुकीचे आहे. जोपर्यंत शासनाची गाईड लाईन येत नाही तोपर्यंत गांव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येणार नाही. परंतु गावात कोरोनाचे रूग्ण वाढले तर शासनाचे काही निर्बंध आले तर त्यानुसार ग्रामपंचायतीला निर्बंध आणावे लागतील. याकरिता नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
यावेळी फौजदार कैलास गोतपागर, डॉ.सागर डांगे, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण व दीपक काकडे यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक ग्रामसेवक मनोज डेरे यांनी केले तर आभार राधा माने यांनी मानले.
चौकट
नागरिकांनी काळजी घ्यावी : सरपंच तेजश्री काकडे
नीरा येथे कोरोनाचा प्रसार पुन्हा वाढू लागला आहे. याकरिता नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी मास्क लावावा व सोशल डिस्टसिंगचे स्वतःहून पालन करणे गरजेचे आहे.
तसेच सर्वांनी आरोग्याची काळजी घेऊन कोरोनाचा प्रसार रोखावा. तसेच नागरिकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळून तसेच लोकसहभागातून झाडे लावण्यास सहकार्य करावे. आपल्या दुकानासमोर स्वच्छता राखावी.