अजित पवारांकडून धनंजय मुंडेची पाठराखण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:12 AM2021-01-23T04:12:06+5:302021-01-23T04:12:06+5:30
पुणे : “ज्या व्यक्तींनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांच्याविरुद्ध वक्तव्ये केली, आता त्याला जबाबदार कोण? धनंजय मुंडे यांना ...
पुणे : “ज्या व्यक्तींनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांच्याविरुद्ध वक्तव्ये केली, आता त्याला जबाबदार कोण? धनंजय मुंडे यांना आम्ही पाठीशी घालत असल्याचा आरोप झाला. त्यावेळी आम्ही ‘संपूर्ण तपास होऊ द्या, सत्य बाहेर येऊ द्या’, म्हणत होतो. पण मुंडे आणि आमच्या पक्षाची नाहक बदनामी झाली,” या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली.
“अशा आरोपांमुळे बहुजन समाजातून पुढे आलेला एक सहकारी बदनाम होतो. त्याचं कुटुंब डिस्टर्ब होतं, त्याला वाली कोण? काही लोक चुका करत असतील त्याची किंमत सगळ्यांनीच मोजायची का,” असे पवार म्हणाले. शुक्रवारी (दि. २२) ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. मात्र त्यानंतर शर्मा यांनी पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेतली. या संदर्भात विचारले असता पवार म्हणाले, “एखादी राजकीय व्यक्ती प्रचंड काम करत एखाद्या पदापर्यंत पोहचते. त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. पण असे काही जेव्हा घडते तेव्हा त्याला क्षणात पायउतार व्हावे लागते. याचा सगळ्यांनी गांभीर्याने विचार करायला पाहिजे.” केंद्र शासनाने पहिल्या टप्प्यात केवळ डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांनाच कोरोनाची लस देण्यास परवानगी दिली आहे. यामुळे सरकारकडून परवानगी मिळेल तेव्हा मी नक्की लस घेईन व तुम्हालाही सांगेन, असे ते म्हणाले.
चौकट
भाजपाचे नगरसेवक फुटणार
“काहीजण वारे बदलते तसे बदलतात. त्यांना पक्षनिष्ठा, पक्षांच्या ध्येयधोरणांशी त्यांना काही घेणे देणे नसते. काहीजण विकास कामे करण्यासाठी पक्ष बदलतात. सध्या आम्ही राज्यात सत्तेत असल्याने पुण्यातील भाजपचे १९ नगरसेवक संपर्कात आहेत. सत्ता टिकवण्यासाठी, महापालिकेत सत्तेवर येण्यासाठी आम्हाला पण बेरजेचे राजकारण करावे लागेल. हे करताना ‘इलेक्टिव्ह मेरिट’ पाहू,” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.