क्षयरोग, कुष्ठरोग पाठोपाठ जिल्हा होणार कुपोषणमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:15 AM2020-12-05T04:15:55+5:302020-12-05T04:15:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्हा क्षयरोग, कुष्ठरोग मुक्त करण्यासोबतच आता जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हा क्षयरोग, कुष्ठरोग मुक्त करण्यासोबतच आता जिल्हा कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील मध्यम स्वरुपाची तसेच तीव्र कुपोषित बालकांचा शोध घेण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत घरोघरी जाऊन बालकांची तपासणी केली जाणार आहे. तसेच त्यांना दत्तक देऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. याची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा परिषदेत मतदारसंघातील नागरिकांच्या तक्रारीसंदर्भात नुकतीच बैठक घेतली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेने सामरे दीडशेहून अधिक मुले ही कुपोषित असल्याची माहिती सादर केली होती. त्या माहितीनंतर ''''पुणे जिल्हा कुपोषणमुक्त करा'''', अशी सूचना सुळे यांनी केली होती. त्यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेने जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी तत्काळ अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. त्याबाबत आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
चौकट
पुणे जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचे उद्दिष्ठ लक्षात ठेऊन जिल्ह्यातील तीव्र व मध्यम कुपोषित बालकांची तपासणी करून दत्तक देण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार मोहिमेची बैठकही यापूर्वी घेण्यात आली आहे. त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. येत्या १५ डिसेंबरपर्यंत बालकांची तपासणी करण्यात यावी आणि त्याचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करावा लागणार आहे.
कोट
‘राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतंर्गत जिल्हा कुपोषणमुक्त मोहीम राबविण्याचा निर्णय जिल्हास्तरवार घेण्यात आला आहे. या मोहिमेत ० ते ६ वयातील बालकांची तपासणी करण्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मोहीम सुरु राहणार आहे. या मोहिमेंतर्गत ० ते ६ या वयातील सर्व तीव्र व मध्यम कुपोषित बालकांचा शोध घेऊन त्याची तपासणी उपकेंद्राच्या स्तरावर आरोग्य अधिकाऱ्यांनी करावी, अशा सूचना आरोग्य अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
-आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी