पुण्यात अन्न व औषध प्रशासनाकडून पावणे दोन कोटीचा भेसळयुक्त माल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:12 AM2021-03-18T04:12:14+5:302021-03-18T04:12:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने वर्षभर मोठ्याप्रमाणात गुटखा व अन्न भेसळयुक्त मालावर कारवाई करून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने वर्षभर मोठ्याप्रमाणात गुटखा व अन्न भेसळयुक्त मालावर कारवाई करून जप्त केला जातो. पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षभरात तब्बल १ कोटी ६७ लाख ६५ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त केला आहे. पुणे विभागात जप्त केलेला साठा ठेवण्यासाठी दोन स्वतंत्र गोदाम असून, ठराविक कालावधीनंतर शास्त्रशुद्ध पध्दतीने साठा नष्ट केला जातो.
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने नियमितपणे हाॅटेलस्, मेडिकल, व्यापारी, गुटखा, दूध व दुग्धजन्य पदार्थ, मिठाई दुकानदार यांच्यावर कारवाई केली जाते. यात अनेक वेळा हा भेसळयुक्त माल जप्त केला जातो. पुणे शहर आणि जिल्ह्यात दर वर्षी मोठ्याप्रमाणात गुटखा, भेसळयुक्त खाद्यतेल, मिठाई दुकानदारांवर धाडी टाकून कारवाई केली जाते. यामध्ये बहुतेक वेळा जप्त केलेल्या माल संबंधित दुकानदाराचे गोदाम सिल करून जप्त केला जातो. तर काही वेळा हा जप्त केलेला माल अन्न व औषध प्रशासनाच्या गोदामामध्ये ठेवला जातो. पुणे शहर आणि जिल्ह्यात गेल्या वर्षभरात ७५ ठिकाणी धाडी टाकल्या व ७० लोकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-----
अन्न व औषध प्रशासनाने विभागात २०२०मध्ये केलेल्या कारवाया
जानेवारी - १५
फेब्रुवारी - १९
मार्च - २९
एप्रिल -४७
मे -४४
जून -४३
जुलै -९
ऑगस्ट -०
सप्टेंबर - ३
ऑक्टोबर - ७
नोव्हेंबर - ९
डिसेंबर - ४
---
पुण्यात अन्न व औषध विभागाची दोन गोदाम
पुणे शहरात अन्न व औषध प्रशासनाकडे स्वत: ची दोन गोदामे आहेत. एक गोदाम तब्बल १२५० स्क्वेअर फूटच, दुसरे २५० स्क्वेअर फूटचे गोदाम आहे.
---
जप्त केलेला साठा ठेवण्यासाठी पुरेशी जागा
अन्न व औषध प्रशासनाकडून वेळोवेळी जप्त केलेला साठा ठेवण्यासाठी आमच्याकडे स्वत: ची दोन गोदाम आहेत. ही जागा सध्या पुरेशी आहे. तसेच नियमानुसार जप्त केलेला भेसळयुक्त माल शास्त्रशुद्ध पध्दतीने नष्ट देखील करण्यात येतो.
- शिवाजी देसाई, सह आयुक्त अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग