कोविड सेंटरमधील अन्नाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:10 AM2021-05-21T04:10:04+5:302021-05-21T04:10:04+5:30
पुणे : कोविड केअर सेंटरमध्ये स्थानिक महापालिकांतर्फे रुग्णांना जेवण दिले जाते. परंतु, प्रत्येक रुग्ण कमी-अधिक जेवण करतो. त्यामुळे बरेच ...
पुणे : कोविड केअर सेंटरमध्ये स्थानिक महापालिकांतर्फे रुग्णांना जेवण दिले जाते. परंतु, प्रत्येक रुग्ण कमी-अधिक जेवण करतो. त्यामुळे बरेच अन्न वाया जाते. ते वाया जाऊ नये म्हणून अन्न वाचवा समितीने महापालिका आयुक्तांकडे पत्र देऊन ज्याला जेवढे अन्न हवे तेवढेच द्यावे आणि अन्नाची नासाडी वाचवावी, अशी विनंती केली आहे. त्यावर महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.
अन्न वाचवा समितीच्या कार्यकर्त्यांकडून यापूर्वी औरंगाबाद येथील आयुक्तांना याबाबत विनंती केली होती. त्या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करण्यात आली आणि खूप अन्न कचऱ्यात जाण्यापासून वाचविण्यात येत आहे. त्यामुळे इतर महापालिकांना त्याबाबत सूचना देऊन अन्न वाचवावे, असे समितीचे सदस्य चंद्रकांत वाजपेयी यांच्या वतीने आवाहन केले आहे.
महापालिका क्षेत्रात संचालित होत असलेल्या सर्व कोविड सेंटर्सवर, तरुण व ज्येष्ठ रोगींना अन्नाची-मात्रा बहुधा एकसमानच उपलब्ध केली जाते. असे असल्यास अधिक वय आणि रोगव्याधीमुळे अनेकानेक कोविडरोगी हे संपूर्ण अन्न संपवत नाही आणि कोरोना पेशंटचे हात लागलेलं अन्न चांगलं असलं, तरी ते इतरास देता येत नाही. त्यामुळे सेंटर्सवर खूपच अन्न नासाडी होते, असे अनुभव आले आहेत. समान अन्न वितरणामुळे अन्न नासाडी होणे स्वाभाविक आहे. म्हणून याबाबत पुणे महापालिका आयुक्तांनाही पत्र देण्यात आले आहे, असे वाजपेयी यांनी सांगितले.
---------------
जंबोत शेकडो रुग्णांना समान अन्न
महापालिकेतर्फे जंबो कोविड सेंटरमध्येच सातशेहून अधिक रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तिथे एवढ्या रुग्णांना दररोज दोन वेळेस समान अन्न दिले जाते. त्यातील बरेच अन्न वाया जात आहे. कोणता रुग्ण दोन पोळ्यांपैकी एकच पोळी खाऊन बाकीची तशीच प्लेटमध्ये ठेवतो. त्यामुळे हे अन्न वाचवता येऊ शकते.