पुण्यात पुन्हा हिट-अँड-रन; ऑडीच्या धडकेत डिलिव्हरी बॉयचा मृत्यू,घरातून केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 10:17 AM2024-10-11T10:17:25+5:302024-10-11T11:19:58+5:30
पुण्यात आणखी एका हिट अँड रन प्रकरणात तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Pune Accident : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असताना आणखी एक हिट अँड रन प्रकरण समोर आलं आहे. आलिशना कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आरोपी कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. आरोपी कार चालकाने या अपघातापूर्वी एका दुचाकीला धडक दिली होती. त्यात तिघांना किरकोळ जखम झाली. यानंतर आरोपीने फुड डिलिव्हरी करणाऱ्या एका तरुणाच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या धडकेत तरुण गंभीर झाल्याने त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी डिलिव्हरी बॉयला मृत घोषित केले.
पुण्यात मध्यरात्री कोरेगाव पार्कमधील गुगल बिल्डिंगजवळ कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. हा अपघात पहाटे दीडच्या सुमारास झाला. एबीसी रोडकडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ॲक्टिव्हा स्कूटरवरून जाणाऱ्या तीन जणांना कार चालकाने धडक दिली. त्यानंतर कार चालकाने डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला धडक दिली. कार चालकाच्या धडकेनंतर डिलिव्हरी बॉय खाली कोसळला आणि पाठोपाठ पाठीमागून आलेल्या दुसऱ्या वाहनाने त्याला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
मुंढवा परिसरात हिट अँड रन प्रकरणाने खळबळ उडाली आहे. आयुष प्रदीप तयाल असे ताब्यात केलेल्या आरोपीचे नाव आहे. हडपसर येथे राहणाऱ्या आयुषने अपघातानंतर पळ काढला होता. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून वाहनाचा क्रमांक शोधून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आयुषला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. अपघातात घडलेली कार पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे.
गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास एबीसी रोडकडून ताडी गुता चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन जाणाऱ्या आयुषने आधी स्कूटीवरील तिघांना धडक दिली होती. त्यात ते तिघे खाली पडले आणि त्यांना किरकोळ मार लागला. त्यानंतर पुढे एक्सेस गाडीवरून जाणाऱ्या टू व्हीलर चालक रुउफ अकबर शेख याला आयुषने पाठीमागून जोरात धडक दिली. त्यामुळे शेख खाली पडला आणि जखमी झाला. जखमी शेखला तात्काळ नोबल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा मृत्यू झाला.