शिक्षक भरतीसाठी उमेदवारांचे शिक्षण आयुक्त कार्यालयासमाेर अन्नत्याग आंदाेलन
By प्रशांत बिडवे | Published: November 27, 2023 06:49 PM2023-11-27T18:49:17+5:302023-11-27T18:53:33+5:30
शिक्षक अभियाेग्यता आणि बुध्दिमत्ता चाचणी ‘टेट’ परीक्षेचा निकाल जाहीर हाेउन आठ महिने पूर्ण झाले
पुणे: राज्यातील शिक्षकांच्या रीक्त पदांच्या ऐंशी टक्के पदांची जाहिरात एकाच टप्प्यात प्रसिद्ध करावी आणि गुणवत्तेनुसार प्रतिक्षा यादी जाहीर करीत शिक्षक भरती पूर्ण करावी या मागणीसाठी नांदेड जिल्ह्यांतील उमेदवाराने शिक्षण आयुक्त कार्यालयासमाेर अन्नत्याग आंदाेलनास सुरूवात केली आहे.
शिक्षक अभियाेग्यता आणि बुध्दिमत्ता चाचणी ‘टेट’ परीक्षेचा निकाल जाहीर हाेउन आठ महिने पूर्ण झाले. शिक्षक भरतीची जाहिरात केव्हा प्रसिद्ध हाेईल याकडे पात्र उमेदवारांचे डाेळे लागलेले आहेत. शासनाने तत्काळ शिक्षकभरती करावी या मागणीसाठी शनिवार दि. २५ पासून संताेष लष्करे (रा. जांब बुद्रुक, ता. मुदखेड, जि. नांदेड) यांनी अन्नत्याग आंदाेलनास सुरूवात केली आहे.
लष्करे म्हणाले, यंदा शैक्षणिक वर्षाची सुरूवात हाेण्यापूर्वी शिक्षकभरती पूर्ण करून शाळेवर नेमणूक करू असे अश्वासन दिले हाेते. टेट परीक्षेचा निकाल २४ मार्च राेजी लागला. मात्र, आतापर्यंत केवळ उमेदवारांचे रजिस्ट्रेशनचे काम पूर्ण झाले आहे. जाहिरात दिल्यानंतर पसंतीक्रम देणे, निवड यादी लावून शाळेवर नियुक्ती केली जाते. मात्र, अनेक महिने हाेउनही अद्याप ही प्रक्रिया पार पडलेली नाही. टेट परीक्षा हाेउन ९ महिने पूर्ण झाले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण पडले आहेत त्यांना नाेकरी लागण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र, सरकार चालढकल करीत असल्याने उमेदवार नैराश्याच्या गर्तेत अडकत असल्याचे त्याने सांगितले. बिहारसारखे राज्य चार महिन्यांत सव्वा लाख शिक्षकांची भरती करू शकते तर महाराष्ट्रातील सरकार का करू शकत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मी डीएड, बी.एड केले, टीईटी पात्र झालाे, टेट परीक्षेतही चांगले गुण मिळविले. पुण्यात काही काळ कुरिअर बाॅय म्हणून काम केले. सध्या एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत १० हजार रूपये पगारावर नाेकरी करताेय. आणखी किती काळ आम्ही वाट पाहायची? राज्य सरकार शिक्षक भरतीस सुरूवात करणार नाही ताेपर्यंत माझे अन्नत्याग आंदाेलन सुरूच राहणार आहे. - संताेष लष्करे, आंदाेलक उमेदवार