लॉकडाऊन काळातले 'अन्नदाते'; पुणे शहरातील भुकेलेल्यांच्या पोटाला मिळतोय दोन घासांचा आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 02:27 PM2020-07-19T14:27:50+5:302020-07-19T14:31:52+5:30
पोलिसांचा नियमित जाच सहन करूनही करतात पुण्यकर्म..
राजू इनामदार
पुणे: कोरोना टाळेबंदीत पोलिसांचा जाच सहन करूनही शहरातील काही खानावळचालक गरजवतांना नियमित जेवण देण्याचे काम करत आहेत. विद्यार्थी, स्वयंपाक करू न शकणाऱ्या अनेक वृद्धांंना त्याचा उपयोग होत आहे.
पुण्यात स्पर्धा परीक्षांसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही हजारात आहे. पेईंग गेस्ट म्हणून ते रहात असतात. टाळेबंदीत त्यांच्यातील अनेक जण पुण्यातच अडकले. त्याशिवाय घरी स्वयंपाक करता येत नाही असे व्रुद्धही अनेक आहेत. अशा सर्वांची दोन वेळच्या जेवणाची सोय करणार्या अनेक खानावळी पुण्यात आहेत.बहुसंख्य खानावळी या घरगुती असून महिलांकडूनच चालवल्या जातात. टाळेबंदीतही आपल्या सदस्यांची गरज म्हणून त्यांच्यातील काहींनी खानावळ सुरू ठेवली आहे.
डबा भरून देणे किंवा मग जागा असेल तर टेबल खुर्ची टाकून तिथेच व्यवस्था करण्यात येते. दोन पोळ्या, सुकी भाजी, आमटी, भात असे एकवेळचे जेवण ५० ते ७० रूपयांपर्यंत मिळते. दोन वेळच्या जेवणाचे दरमहाचे अनेक ग्राहक या खानावळ चालकांकडे आहेत. मागील अनेक वर्षांपासून हा व्यवसाय सुरू असून त्यातल्या काही खानावळी तर २५ ते ३० वर्षांपासूनच्या आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या निमित्ताने पुण्यात रोज येणार्यांची, त्यातल्या इथेच राहणार्यांची संख्या काही लाखात आहे. त्यातल्या काही हजारांची जेवणाची सोय याच खानावळींमधून होत असते.
कोरोना टाळेबंदीची कुऱ्हाड याही व्यवसायावर कोसळली. त्यांचाही व्यवसाय बंद झाला, मात्र त्यामुळे त्यांच्या जेवणावर अवलंबून असलेल्यांची ऊपासमार होऊ लागली. त्यामुळे अनेक महिलांंनी आपला व्यवसाय पुन्हा सुरू केला. दत्तवाडीतच अशा चार खानावळी आहेत. विद्यार्थी वर्ग राहण्याचे प्रमाण नवी पेठ, दांडेकर पूल या भागात जास्त आहे. तिथेही अशा खानावळी आहेत. त्याशिवाय कर्वे रस्ता परिसरातही काहींनी डबा देण्याचे काम सुरू ठेवले आहे.
यातल्या बहुतेकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्यांचे दर वाढवलेले नाहीत. टाळेबंदीच्या आधी होते तेच दर कायम ठेवले आहेत.
दर जूनेच
टाळेबंदीत धान्य, रोजचा भाजीपाला यांचे भाव वाढले, मात्र आमचे मेंबर नेहमीचे असल्याने आम्ही दर वाढवले नाहीत. घरचेच लोक स्वयंपाक करत असल्याने मजूरी द्यावी लागत नाही. त्यामुळे परवडते.
अमित माने, श्रावणी खानावळ
----/
गरजूंची भूक भागवण्यात आनंद
पोलिसांचा त्रास होतो, पण त्यापेक्षा गरजूंना डबा देता येतो याचा आनंद जास्त आहे. अनेकांची अडचण असते. वयामुळे स्वयंपाक होत नाही. त्यांंना आम्ही नियमीत डबा देतो.
-- शंकर गिरी. बालाजी खानावळ
..........//
खानावळीमुळेच राहणे शक्य
मी रहायला देहूरोडला आहे. अभ्यासासाठी म्हणून पुण्यात एकटाच राहतो आहे. खानावळ सुरू असल्यामुळेच इथे एकटे राहणे शक्य होत आहे.
-- ऊदय महाले, विद्यार्थी
...../(३२७)