पुण्यात शालेय विद्यार्थ्यांना विषबाधा ; २१ विद्यार्थी रुग्णालयात दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 02:39 PM2019-08-21T14:39:29+5:302019-08-21T14:43:33+5:30
शालेय पोषण आहारातील भाताचे सेवन केल्यामुळे पुण्यात २१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. कात्रज येथील स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.
पुणे : शालेय पोषण आहारातील भाताचे सेवन केल्यामुळे पुण्यात २१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. कात्रज येथील स्वर्गीय रामभाऊ म्हाळगी फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कात्रज येथील या शाळेतील इयत्ता ८वी, ९वी आणि १०वी'च्या २१ विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षिकेने सकाळी १०च्या सुमारास शालेय पोषण आहारातील खिचडी खाल्ली. खातानाही त्यांना रॉकेलचा वास येत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र त्यानंतर तासाभराने त्यांना मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरु झाला. शाळेने तात्काळ भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. ४ दिवसांपूर्वी नव्या बचत गटाला (सेंट्रल किचन) या कामाचा ठेका दिल्याचे समजते. दरम्यान शाळेने या प्रकरणी भारती विद्यापीठाच्या पोलीस निरीक्षकांना पत्र दिले असून त्यात अन्न शिजवणाऱ्या रजनी महिला कार्यकारी या संस्थेवर कारवाईची विनंती केली आहे.
गेली दोन दिवसापासून खिचडीभात खाल्ल्यानंतर विद्यार्थ्यांना मळमळत होत असल्याच्या तक्रारी होत्या. दोन दिवसांपूर्वी सुद्धा भात खाल्यावर मुलांना त्रास झाला होता. त्याचवेळी शाळेकडून कारवाई झाली असती तर आजचा गंभीर प्रसंग उद्भवला नसता असा आरोप पालक कैलास पाचापूरे यांनी केला आहे.खिचडीभातालादरम्यान या प्रकरणी स्थानिक नगरसेवकांनीही आक्षेप घेत मुलांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळेवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सध्या या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.