खाद्यपदार्थांच्या गाड्या वाढल्या

By Admin | Published: May 29, 2017 01:46 AM2017-05-29T01:46:00+5:302017-05-29T01:46:00+5:30

सासवड शहराचा विस्तार जसा वाढत आहे तशी रहदारी वाढली, रस्ते मोठे होत आहेत. बरोबर रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांच्या

Food prices have increased | खाद्यपदार्थांच्या गाड्या वाढल्या

खाद्यपदार्थांच्या गाड्या वाढल्या

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
सासवड : सासवड शहराचा विस्तार जसा वाढत आहे तशी रहदारी वाढली, रस्ते मोठे होत आहेत. बरोबर रस्त्याच्या कडेला खाद्यपदार्थांच्या गाड्या वाढल्या आहेत. सासवडमधील सोपाननगरमध्ये तर स्वतंत्र ‘खाऊ गल्ली’ आहे. तेथे हातगाड्या लावून पदार्थ विक्री चालते. यामध्ये वडापाव, भजी, पाणीपुरी, चायनीज याचे प्रमाण लक्षणीय आहे.
सासवडकर नागरिक, प्रवासी या पदार्थांचा आस्वाद घेतात. परंतु हे पदार्थ तयार करताना कोणते साहित्य वापरले जाते, त्याचा दर्जा काय? याची तपासणी कोण करते, हे कळत नाही किंवा याची तपासणी कधीच होत नाही. रस्त्याच्या कडेला उभे राहून खाताना हे पदार्थ कोणत्या तेलात तयार झाले? रस्त्याची धूळ त्यावर बसलीय का? पदार्थ दूषित आहेत का, याचा कोणी विचार करताना दिसत नाही. शासनाचे ‘अन्नभेसळ प्रतिबंधक’ खाते आहे. पण त्याचे कार्यालय सासवड येथे नाही, तर पुणे येथे आहे. सासवडमधील बेकरी दुकाने, किराणा माल दुकाने, हॉटेल यांना दरवर्षी या विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. दुकानदार तो पुणे येथे जाऊन आणतात. परंतु खाद्यपदार्थ भेसळयुक्त नाहीत, याची तपासणी होताना दिसत नाही. सासवड परिसरातून अनेक दूधवाले घरोघरी येऊन दुधाचा रतीब घालतात. पण त्यामध्ये पाणी किती, हे कोणीच तपासत नाही.
सासवडच्या रस्त्यावर चहा, वडापाव अशा विक्रीच्या अनेक गाड्या आहेत, चायनीजच्या गाड्या आहेत, रहदारी वाढल्याने रात्रीच्या वेळी या गाड्यांवर खाणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. उन्हाळा सुरू झाला, की रस्त्याच्या कडेला रसवंतीगृहे उभी राहतात, निरनिराळी सरबते करणाऱ्या गाड्या उभ्या राहतात, ज्यूस गाड्या उभ्या राहतात, उन्हामुळे त्रासलेले लोक त्याचा आस्वादही घेतात, महाविद्यालयीन मुले, मुली, पाणी, चायनीज पदार्थ आवडीने खातात. परंतु हे पदार्थ करताना पाणी कोठून आणले, याचा विचार करीत नाहीत, शासनाचे संबंधित खातेही या पदार्थांची कधी तपासणी करीत नाहीत. सासवड शहर वाढते आहे, शिक्षण, नोकरी, शासकीय कार्यालयात कामे, कोर्टकामे यासाठी हजारो लोक इथे येतात. खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतात. नागरिकांच्या आरोग्यासाठी या पदार्थांची नियमित तपासणी आवश्यक आहे. तसेच परवाना न काढणाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे.

यापूर्वी झाली कारवाई

1काही वर्षांपूर्वी अन्नभेसळ विभाग नगरपालिकेच्या अखत्यारित होता. त्या वेळी दुधाचे, चहाचे, खाद्यपदार्थांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविले जात असत, काही कोर्ट केसही झाल्या होत्या. त्यानंतर मात्र हा विभाग नगरपालिकेकडून शासनाकडे वर्ग झाला.
2असे असले तरी सर्व खाद्यपदार्थांची नियमित
तपासणी होणे आवश्यक आहे. हातगाड्यांप्रमाणेच महामार्गावर ढाबे आहेत. तेथील खाद्यपदार्थ कसे आहेत? सांडपाण्याची व्यवस्था नीट होते का, हे कोणी पाहत नाही. अशा प्रकारे तुमचे काही वेळा साथीचे आजार पसरतात.

Web Title: Food prices have increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.