पुणे विमानतळावर खाद्यपदार्थांचे ‘रोबोटिक’ दालन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 01:44 AM2018-05-26T01:44:26+5:302018-05-26T01:44:26+5:30
देशांतर्गत विमानसेवा असलेल्या विमानतळावरील हे पहिलेच यांत्रिक दालन असल्याचा दावा विमानतळ प्रशासनाने केला आहे.
पुणे : लोहगाव विमानतळावर शुक्रवारपासून खाद्यपदार्थांचे रोबोटिक दालन खुले करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांकडून पैसे घेण्यापासून ते पदार्थ देण्यापर्यंतचे सर्व काम यंत्राद्वारेच केले जाणार आहे. देशांतर्गत विमानसेवा असलेल्या विमानतळावरील हे पहिलेच यांत्रिक दालन असल्याचा दावा विमानतळ प्रशासनाने केला आहे.
भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे विभागीय कार्यकारी संचालक केशव शर्मा यांनी शुक्रवारी या दालनाचे उद्घाटन केले. यावेळी विमानतळाचे संचालक अजय कुमार उपस्थित होते.
अजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर प्रवाशांच्या आवडीचे विविध खाद्यपदार्थ शहरातील विविध दर्जेदार विक्रेत्यांकडून तयार करून घेतले जाणार आहेत. त्यानंतर हे पदार्थ मशिनमध्ये ठेवले जातील. ग्राहकांना यंत्रासमोर असलेल्या आय पॅडवर आपल्याला हवे असलेले खाद्यपदार्थ निवडावे लागतील. हा आय पॅड यंत्राला जोडण्यात आला आहे. खाद्यपदार्थ निवडल्यानंतर त्यावर आलेली किंमत डेबिट, के्रडीट किंवा रोख स्वरुपात देता येईल.
पैसे दिल्यानंतर यंत्राला असलेल्या रोबोटिक हातांद्वारे मायक्रोवेव ओव्हनमध्ये गरम केलेले खाद्यपदार्थ ग्राहकांना मिळतील. शाकाहारी व मांसाहारी पदार्थांसाठी स्वतंत्र ओव्हनची व्यवस्था आहे. या पदार्थांचे बील ग्राहकांना लगेचच मोबाईलवर पाठविले जाईल. ग्राहकांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध होणार असल्याने त्यांना वेगळा अनुभव मिळेल, असे अजय कुमार यांनी सांगितले.