खडकाळ माळरानावर फुलविले नंदनवन

By Admin | Published: January 23, 2017 02:19 AM2017-01-23T02:19:26+5:302017-01-23T02:19:26+5:30

शेतीतील शिक्षण, अभ्यासाला नियोजनाची जोड दिल्यास खडकाळ माळरानावर नंदनवन बहरू शकते, याचा प्रत्यय काळेवाडी, दिवे

Fooled paradise on rocky ocean | खडकाळ माळरानावर फुलविले नंदनवन

खडकाळ माळरानावर फुलविले नंदनवन

googlenewsNext

सुनील लोणकर / गराडे
शेतीतील शिक्षण, अभ्यासाला नियोजनाची जोड दिल्यास खडकाळ माळरानावर नंदनवन बहरू शकते, याचा प्रत्यय काळेवाडी, दिवे येथील प्रयोगशील शेतकरी नितीन जाधव यांची अंजीर शेती पाहिल्यावर येतो. उपलब्ध पाण्याचे व्यवस्थापन, दर्जेदार माल पिकवण्याची हातोटी साधत शेतीत सकारात्मक चित्र निर्माण केले आहे.
दिवे घाट ओलांडला, की डावीकडे काळेवाडी गाव लागते. काळेवाडी-मल्हारगड रस्त्याला त्यांची शेती आहे. त्यांचे आजोबा विष्णू जाधव यांचा अंजीर उत्पादनात हातखंडा आहे. हे पीक १०० झाडापुरते मर्यादित होते. कोरडवाहू, खडकाळ, मुरमाड क्षेत्र ही मुख्य समस्या होती. पावसाच्या पाण्यावर ज्वारी, बाजरी अशीच पिके घेण्यात येत.
नितीन जाधव यांचे वडील दिलीप जाधव सासवड येथे कृषी पर्यवेक्षक आहेत. नोकरीमुळे त्यांना शेतीकडे पुरेसे लक्ष देता येत नसल्याने आजोबांनंतर नव्या पिढीचे नेतृत्व नितीन जाधव यांच्याकडे आले. शेती करायची असेल तर पाणी आवश्यक आहे. त्यामुळे पाण्याची समस्या मिटविण्यासाठी त्यांनी एक कोटी लिटर क्षमतेचे ४५ बाय ४५ मीटर व ३५ फूट खोल शेततळे तयार करून हंगामी विहिरीतून पाणी उपसून त्यात संरक्षित पाणीसाठा केला. शेततळे शेतजमिनीपेक्षा ३५ फूट उंच असल्याने सायफन पद्धतीने ठिबकद्वारे पाणी दिले जाते. शेततळ्यामुळे पाण्याची शाश्वती आल्याने नितीन यांनी अंजीर लागवडीचा निर्णय घेवून २०११ साली बारामती कृषी विज्ञान केंद्रातून दिनकर वाणाची १९० रोपे आणून सव्वा एकरात लागवड केली. सध्या हीच झाडे चांगले उत्पादन देत आहे.
अंजीराचे नियोजन करताना ते शक्य तेवढी रासायनिक खते, कीटकनाशके टाळण्यावर भर देतात. प्रत्येक झाडाला १० किलो शेणखत, ३ किलो निंबोळी खत, तर दीड किलो मासळी खत दिले जाते. एकरी पाच किलो अझोटोबॅक्टर शेण खतात देतात. एकरी दोन ते अडीच किलो ट्रायकोडर्माचा वापर होतो. तांबेरासाठी क्लोरोथॅनील, कार्बेनडाझिम,ठराविक कालावधीत फवारणी, खोडकिडा नियंत्रणात डायक्लोरव्हासची इंजेक्शन, पाणी बहारावेळी १० लिटर, फळे वाढताना २० लिटर, फळे पक्व होताना १० लिटर देतात. नितीन यांच्याकडे बालाजी कोळेकर, सह तीन मजूर बारमाही असतात. याशिवाय झाडांच्या चाळणीचे काम परिसरातील मजुरांच्या टोळ्यांना प्रतिझाड ५० रुपये याप्रमाणे दिले जाते. जुन्या स्कूटरला एचटीपी पंप बसवून कमी खर्चात फवारणी यंत्रणा तयार केली आहे. यासाठी एकूण १५ रुपये हजार खर्च आला. प्रतितास फवारणीसाठी एक लिटर पेट्रोल लागते.
नितीन हे बीएससी हॉर्टिकल्चर व कृषी व्यवसाय व्यवस्थापन शाखेतील पदवीधर आहे. तसेच अ‍ॅग्री क्लिनिक अँड अ‍ॅग्री बिजनेस प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला.

Web Title: Fooled paradise on rocky ocean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.