'गणपती असो वा अल्ला ईश्वर...' २५ वर्षांपासून गौरी-गणपतीच्या भक्तीत मुस्लीम कुटुंब तल्लीन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 11:32 AM2022-09-05T11:32:33+5:302022-09-05T11:32:55+5:30

हिंदू-मुस्लिमांनी स्वीकारली आमची निरपेक्ष भक्ती

For 25 years, a Muslim family has been engrossed in the devotion of Gauri Ganpati | 'गणपती असो वा अल्ला ईश्वर...' २५ वर्षांपासून गौरी-गणपतीच्या भक्तीत मुस्लीम कुटुंब तल्लीन

'गणपती असो वा अल्ला ईश्वर...' २५ वर्षांपासून गौरी-गणपतीच्या भक्तीत मुस्लीम कुटुंब तल्लीन

Next

रविकिरण सासवडे 

बारामती : सर्व समाजबांधव आमच्या घरी गौरी-गणपतीच्या दर्शनाला येतात, तर महिलावर्गदेखील आमच्या घरी हळदी-कुंकवाला येतो. भक्ती ही निर्वाज्य आणि सरळ असते. ईश्वर असो वा अल्ला त्याचं रूप एकतर सगुण साकार किंवा निर्गुण निराकार असते. हे संत-महात्म्यांनी सांगितला आहे. गौरी-गणपतीच्या भक्तीमध्ये आम्हाला न कोणते विघ्न आले, ना कोणी विरोध केला. उलट समाजातील हिंदू आणि मुस्लीम बांधवांनीदेखील आमची ही निरपेक्षभक्ती स्वीकारली, अशी भावना जमीर शेख यांनी व्यक्त केली.

जमीर सांगतात, मागील २५पेक्षा जास्त वर्षांपासून आमच्या घरी परंपरेप्रमाणे गौरी-गणपतीची अगदी साग्रसंगीत स्थापना होते. सुरटी (ता. करमाळा, जि. सोलापूर ) हे आमचे गाव. एकदा शेतामध्ये आजोबा शाबुद्दीन शेख व आजी पारशी शेख यांना काम करत असताना पितळेचे गौरीचे मुखवटे सापडले. तेव्हापासून आजी-आजोबांनी आमच्या घरी गौरी-गणपतीच्या प्रतिष्ठापनेस सुरुवात केली. कामानिमित्त आम्ही चार वर्षांपूर्वी जंक्शन (ता. इंदापूर, जि. पुणे ) येथे स्थायिक झालो. येथेदेखील आम्ही आमची परंपरा कायम ठेवली. आज चार वर्षांनंतरही दरवर्षी नित्यनेमाने गौरी-गणपतीच्या सणाला आमच्या घरी हिंदू-मुस्लीम बांधव एकत्र येतात. गौराई तीन दिवस मुक्कामी असतात. या काळात हिंदू-मुस्लीम महिला आमच्या घरी हळदी-कुंकवास येतात. माझी आई अफसाना शेख हीदेखील अनेक हिंदू घरांमध्ये हळदी-कुंकवास जाते. आपला समाज असाच आहे. प्रत्येकाचे सण एकमेकांमध्ये विरघळून गेले आहेत. सण उत्सव हे आनंद वाटण्यासाठी असतात. हा आनंद फक्त स्वतःपुरता मर्यादित न ठेवता, समाजातील प्रत्येक घटकाला त्यामध्ये सामावून घेतले पाहिजे. अल्ला असो व गणपती असो ईश्वर सर्व जीवांचं भलंच पाहत असतो. आपल्या संत-महात्म्यांनी हाच संदेश दिला आहे, असेही जमीर शेख यांनी सांगितले.

समाजा-समाजामध्ये तेढ पसरवणारे विकृत अनेक आहेत. मात्र या विकृतीला याच समाजातील सर्वसामान्य हिंदू व मुस्लीम आपल्या एकोप्याचे दर्शन घडवून नेहमी मात देत आला आहे. ईश्वरभक्तीचं अनोखा रूप दाखवणार शेख कुटुंब त्यासाठीच समाजासमोर आदर्श उदाहरण आहे, अशी भावना शेख कुटुंबाचे स्नेही अशोक गावडे व श्रेणिक सासवडे यांनी व्यक्त केली.

Web Title: For 25 years, a Muslim family has been engrossed in the devotion of Gauri Ganpati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.