...त्यासाठी मी पंतप्रधानांची वेळ घेऊन भेटायला जाणार; शरद पवारांची ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 02:39 PM2022-03-24T14:39:29+5:302022-03-24T14:40:07+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न चालू केले
बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रयत्न चालू केले आहेत. ते प्रयत्न आपल्या उपक्रमास बळकटी देण्याचे काम करतील. त्यामुळे राज्यातील सेंद्रीय शेतीबाबतचे केंद्र स्तरावरील प्रश्न सोडवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वेळ घेऊन भेटणार असल्याचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र ऑरगॅनिक अॅण्ड रेसिड्यु फ्री फार्मर्स असोसिएशन (मोर्फा) च्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक व्यवस्थापकीय संचालक युुुगेंद्र पवार यांच्या ‘अनंतारा’ निवासस्थानी ज्येष्ठ नेते पवार यांच्या समवेत पार पडली. यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले, राज्यातील प्रश्न सोडविण्यासाठी संबधित मंत्री, सचिव, अधिकारी, मोर्फा पदाधिकाऱ्यांसाठी स्वत: बैठक घेत पुढाकार घेणार आहे. येणाऱ्या काळामध्ये मोर्फा च्या माध्यमातून सेंद्रिय शेतीच्या चळवळीस नक्कीच गती येईल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
‘मोर्फा’ चे संचालक गणेश शिंदे म्हणाले, सेंद्रिय शेतमाल विक्रीसाठी विश्वासहर्ता महत्वाची आहे. त्यासाठी युगेंद्र पवार यांनी अमुल सारखा एकच ब्रँड करून ग्राहकांचा विश्वास संपादन केल्यास मार्केटिंगची समस्या राहणार नाही.
....त्यानंतर दुपारी पवार स्वत: बैठकीत पोहोचले.
‘मोर्फा’च्या बैठकीसाठी राज्यातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार बारामतीत असल्याचे समजल्यानंतर सर्वांनी त्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. शेतकऱ्यांची हि इच्छा काही पदाधिकाऱ्यांनी पवार यांना सांगितली. यावर ज्येष्ठ नेते पवार यांनी शेतीप्रयोग करणारे उपक्रमशील शेतकरी बारामतीत एकत्र आले आहेत. एवढ्या जणांना येथे गोविंदबागेत येण्याचा त्रास देण्यापेक्षा मीच बैठकीत पोहचतो, असा निरोप दिला. त्यानंतर दुपारी पवार बैठकीत पोहोचले.