महारेराच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच यंदा चार हजार गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण
By नितीन चौधरी | Published: January 13, 2024 04:28 PM2024-01-13T16:28:07+5:302024-01-13T16:31:39+5:30
कोरोनाच्या प्रभावामुळे २०२२ मध्ये केवळ १,७४९ प्रकल्प होऊ शकले पूर्ण...
पुणे : महारेराच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच राज्यात एका वर्षात ३ हजार ९२७ गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण झाले आहेत. त्यात पुणे विभागातील १ हजार ३७२ प्रकल्पांचा समावेश आहे, तर मुंबई विभागात १ हजार ७४९ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत दरवर्षी २ हजारांपेक्षा जास्त गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण झाले होते. त्यात २०१९ मध्ये २,२३२ तर २०२० मध्ये २,५७३ आणि २०२१ मध्ये २,३२६ गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण झाले होते. मात्र, २०२२ मध्ये बांधकाम क्षेत्राला कोरोनाचा मोठा फटका बसल्याचे दिसून आले आहे. ज्यामुळे यावर्षी केवळ १ हजार ७४९ प्रकल्प पूर्ण होऊ शकले होते.
राज्यात सर्वांत जास्त प्रकल्प पूर्ण होण्याचे प्रमाण मुंबई विभागात असून, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या परिसरात १ हजार ५५२ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यानंतर पुणे विभागातही १ हजार ३७२ प्रकल्प पूर्ण झाले असून, यात पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांचा समावेश आहे. यानंतर नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबारचा समावेश असलेल्या नाशिक विभागात ५०० प्रकल्प पूर्ण झाले असून, नागपूर विभागातील नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा जिल्ह्यांत ३१८, तर संभाजीनगर विभागातील संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, लातूर, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांत १२३ प्रकल्प पूर्ण झाले आहेत. अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम या अमरावती विभागात ५६ प्रकल्प पूर्ण झाले, तर दीव-दमणमध्ये ६ प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
राज्यात २०२२ मध्ये कोरोनामुळे केवळ १,७४९ प्रकल्प पूर्ण झाले होते. यात मुंबई विभागात ७८०, पुणे विभागात ५८, नाशिकमध्ये २१०, नागपूर विभागात ७४, संभाजीनगरमध्ये ७३, अमरावती विभागात २६ तर दादरा-नगर हवेलीमध्ये ३ प्रकल्प पूर्ण झाले होते.
वर्षनिहाय प्रकल्पांचा तपशील
वर्ष- प्रकल्पांची संख्या
२०१७ - ४०४
२०१८ - १,५९५
२०१९ - २,२३२
२०२० - २,५७३
२०२१ - २,३२६
२०२२ - १,७४९
२०२३ - २,९२७
प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन घर खरेदीदारांची गुंतवणूक सुरक्षित आणि संरक्षित राहावी, यासाठी महारेरा सातत्याने प्रयत्नशील आहे. बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पाचे सनियंत्रण करण्यासाठी ‘महारेरा’ने सूक्ष्म सनियंत्रण कक्ष सुरू केलेला आहे. यासाठीच त्रैमासिक विविध प्रकल्प प्रगती अहवालाबाबत महारेरा आग्रही आहे. यामुळे प्रकल्पातील त्रुटी वेळीच शोधणे शक्य होत आहे.
- अजोय मेहता, अध्यक्ष, महारेरा