मावळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान केंद्रांवर मतदान साहित्य घेऊन पथक रवाना

By विश्वास मोरे | Published: May 12, 2024 05:01 PM2024-05-12T17:01:22+5:302024-05-12T17:01:42+5:30

मावळ लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून २ हजार ५६६ मतदान केंद्रे

For the Maval Lok Sabha election the team left for the polling stations with voting material | मावळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान केंद्रांवर मतदान साहित्य घेऊन पथक रवाना

मावळ लोकसभा निवडणूकीसाठी मतदान केंद्रांवर मतदान साहित्य घेऊन पथक रवाना

पिंपरी : मावळ लोकसभेच्या निवडणूक सोमवारी होणार आहे. केंद्रांवर मतदानासाठी आवश्यक साहित्य वितरण करण्यात आले. सर्व पथके मतदान केंद्रांकडे रवाना झाली आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी दिली. 

मावळ लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूकीसाठी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार असून विधानसभा मतदारसंघनिहाय निश्चित केलेल्या ठिकाणाहून आज सकाळी ८ वाजेपासून मतदान साहित्य वितरण प्रक्रियेला सुरूवात झाली. प्रारंभी सर्व ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान केंद्र अधिकारी यांना तिसरे अंतिम प्रशिक्षण देऊन मतदान प्रक्रियेबद्दल तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचनांची सविस्तर माहिती देण्यात आली.  मावळ लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण २५ लाख ८५ हजार १८ मतदार असून २ हजार ५६६ मतदान केंद्रे आहेत. यासाठी आवश्यक असणा-या  ७ हजार ६९८ बॅलेट युनिट, २ हजार ५६६ कंट्रोल युनिट आणि २ हजार ५६६ व्हीव्हीपॅट यंत्र मतदान पथकनिहाय ताब्यात देण्यात आले. तसेच विविध लिफाफे, स्टेशनरी, ओआरएससह  प्रथमोपचारपेटी, दिशादर्शक फलक,  मतदान प्रक्रीया पार पडण्यासाठी आवश्यक साहित्य, विविध अहवालाच्या प्रती आणि मार्गदर्शक सूचना साहित्य यावेळी सुपूर्द केले. या पथकांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर घेऊन जाण्यासाठी वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. बसेस, जीप तसेच इतर वाहनांवर केंद्र क्रमांक दर्शविण्यात आला होता.

 नियोजनबद्ध पद्धतीने साहित्याचे वितरण करून पथकांना वाहनांमध्ये बसवून केंद्रस्थळी पोहोचविण्यात आले. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी चिंचवड तसेच पिंपरी येथील साहित्य वितरण केंद्रावर भेट देऊन पाहणी केली. सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या अधिपत्याखाली विधानसभा मतदारसंघ निहाय संपूर्ण प्रक्रियेचे व्यवस्थापन करण्यात आले आहे साहित्य वाटपाच्या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवाय प्रत्येक पथकासोबत स्वतंत्र पोलीस पथक देण्यात आले आहे.  

Web Title: For the Maval Lok Sabha election the team left for the polling stations with voting material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.