विर्सजन मिरवणुकीचा श्रीगणेशा करण्याचा पुणे महापालिका आयुक्तांना सलग दुसऱ्या वर्षी मान
By राजू हिंगे | Published: September 27, 2023 03:02 PM2023-09-27T15:02:19+5:302023-09-27T15:03:36+5:30
प्रशासक राज सुरू असल्याने विर्सजन मिरवणुकीचा श्रीगणेशा करण्याचा मान सलग दुसऱ्या वर्षी आयुक्त म्हणुन विक्रम कुमार यांना
पुणे : पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाच्या विर्सजन मिरवणुकीला अनंत चतुदर्शीच्या मुहुर्तावर गुरूवारी सकाळी १०.३०वा. महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्याजवळ आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते होणार आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्यामुळे प्रशासक राज सुरू असल्याने विर्सजन मिरवणुकीचा श्रीगणेशा करण्याचा मान सलग दुसऱ्या वर्षी प्रशासक तथा आयुक्त म्हणुन विक्रम कुमार यांना मिळणार आहे.
पुणे शहरातील गणेश विर्सजन मिरवणुकीची सुरवात महापौरांच्या हस्ते महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केला जाते. पण पुणे महापालिकेच्या नगसेवकांची मुदत १४ मार्च २०२२ रोजी संपली आहे. पण पालिकेची निवडणुक ही पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेत आयुक्त विक्रम कुमार यांची प्रशासक म्हणुन नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २०२२च्या गणेश विर्सजन मिरवणुकीची सुरवात आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते झाली होती. आता ही पुणे महापालिकेची निवडणुक झालेली नाही. त्यामुळे नगरसेवक आणि उपमहापौर, महापौर नाहीत. त्यामुळे यंदाही गेल्यावर्षीप्रमाणे पुण्याच्या वैभवशाली विर्सजन मिरवणुकीची सुरवात आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करून होणार आहे.
टिळक चौकात स्वागत मंडप
टिळक चौकात (अलका टॉकीज) पुणे महापालिकेच्या वतीने गणेश मंडळांच्या स्वागतासाठी मंडप उभारण्यात आला आहे. या मंडपात पालिकेच्या वतीने महापौर गणेश मंडळाचे श्रीफळ देउन स्वागत करतात. पणयंदाही महापौर नसल्यामुळे आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि अधिकारी यांच्या हस्ते गणेश मंडळांना श्रीफळ देउन स्वागत केले जाणार आहे. त्यासाठीची सर्व प्रशासकीय तयारी पुर्ण झाली आहे.