शहराच्या स्वच्छतेसाठी तीस वर्षांपासून कार्यरत; अवघ्या अडीच रुपये मानधनात केली सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 08:48 AM2022-10-03T08:48:19+5:302022-10-03T08:48:36+5:30
आयुष्यातल्या सर्व चढ-उतारांना कच-यानेच सोबत केल्याचं अभिमानाने सांगतेय नवदुर्गा संगीता रिठे.
पांडुरंग मरगजे
धनकवडी : शहराची स्वच्छता राखण्याची जबाबदारी महापालिकेची असली तरी शहराच्या या स्वच्छतेत कचरावेचक महिलांचेही तितकेच महत्त्वपुर्ण योगदान आहे. उदरनिर्वाहासाठी पती सोबत शहरात आलेल्या एका कचरा वेचक महिले ने स्वच्छतेचे वृत्त स्विकारले आणि त्या क्षणापासून आज तब्बल तीस वर्षे झाली उन वारा,पावसात सुद्धा ते वृत्त एक सेवा म्हणून अखंड चालू आहे शहर स्वच्छतेसाठी हयात घालवणार्या या नवदुर्गेचे नाव आहे संगीता रिठे..
दादासाहेब रिठे यांच्या बरोबर संगीता यांचा विवाह झाला. त्यांचे मुळ गाव बारामती तालुक्यातील काठेवाडी. विवाहानंतर रिठे परिवार उदरनिर्वाहा साठी पुणे शहरातील तळजाई वसाहत पद्मावती येथे दाखल झाले. दरम्यानच्या काळात संगीता रिठे यांनी आपल्या कुटुंबाला हातभार लावण्यासाठी कचरा गोळा करण्याच्या कामाला सुरुवात केली. त्याकाळात म्हणजे तीस वर्षांपूर्वी अवघा अडीच रुपये महिना मानधन संगीता यांना मिळत असे. आहे ते मिळविणे हि जिकिरीचे असायचे.
दरम्यान पतीच्या निधनानंतर हाच व्यवसाय एक वृत्त म्हणून स्विकारलेल्या संगीता यांनी आपल्या संपूर्ण परिवाराचा संभाळ केला. आज वयाची पन्नाशी ओलांडून हि संगीता त्याच उत्साहात कचरा गोळा कळण्याचं काम आजही करत आहेत. आजमितीला मुलगा, सून व नातवंडे असा तेरा जणांचा त्यांचा परिवार आहे. परिवारातील एक मुलगा सून नातवंडे मुळ गावी असून संगीता यांच्या बरोबर एक मुलगा, सून व नातवंडे असा नवजणां चा परिवार आहे. मुलगा आणि सून दोघेही कचरा वेचक म्हणूनच काम करत आहेत.
संगीता यांच्या घरची परिस्थिती तशी बेताचीच असल्या ने त्यांनी विवाहानंतर लगेचच कामाला सुरुवात केली होती. कधीतरी परिस्थिती सुधारेल या आशेनेच त्या मेहनत करत राहिल्या. आई वडि लांच्या कडे लहानपणा पासून काम करणार्या संगीता यांची लग्नानंतर तरी सुख पदरात पडेल अशी आशा होती. पण ती सुद्धा फोल ठरली.
पती हि कचरा गोळा करण्याचे काम करत तेही कायमस्वरूपी नसल्याने त्यांना श्रीमंतीचे सुख कधी अनुभवताच आले नाही. परंतु याची खंत काम करताना त्यांच्या चेहऱ्यावर कधीही दिसली नाही. सुरुवातीपासूनच आयुष्यात कष्टच लिहिलेले आहेत, त्याला कोण काय करणार असे संगीता सांगतात. रस्त्यावर एक महिला कचरा वेचताना पाहून त्यांना अनेकांनी हिणवले. एकाने म्हटलं सुद्धा की 'कष्ट करून काही व्हायचं नाही, नशिबात जे लिहिले आहे तेच होणार'. त्यावर खचून न जाता त्यांना उत्तर देताना त्या म्हणाल्या की, ‘कदाचित नशिबात लिहिले असणार की कष्ट केल्यानेच सर्वकाही मिळेल.' संगीता चं हे वाक्य साधं सरळ असलं तरीया उत्तरातून बरंच काही शिकण्यासारखं आहे, हे विसरून चालणार नाही.
याशिवाय पूर्वीच्या खडतर आयुष्याच्या मानाने आजचं जगणं जरा बरं असलं तरी आपल्या आयुष्यातल्या सर्व चढ-उतारांना कच-यानेच सोबत केल्याचं हि नवदुर्गा (संगीता रिठे) अभिमानाने सांगतात.