पुण्यामधील २१ पैकी १० मतदारसंघांतील बंडखोर कोणासाठी जुळवणार विजयाचे गणित?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 04:40 PM2024-11-09T16:40:46+5:302024-11-09T16:42:25+5:30

Maharashtra Assembly Election 2024: पुणे जिल्ह्यात २१ मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून १० मतदारसंघांत बंडखोर निर्णायक ठरणार आहेत. शरद पवार विरुद्ध अजित पवार गट अशी थेट लढत ८ मतदारसंघांत होणार असून पाच मतदारसंघांत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भाजपशी भिडणार आहेत.

For whom will the rebels in 10 out of 21 constituencies in Pune calculate the victory? | पुण्यामधील २१ पैकी १० मतदारसंघांतील बंडखोर कोणासाठी जुळवणार विजयाचे गणित?

पुण्यामधील २१ पैकी १० मतदारसंघांतील बंडखोर कोणासाठी जुळवणार विजयाचे गणित?

- सचिन कापसे 
पुणे - जिल्ह्यात २१ मतदारसंघांतील लढतीचे चित्र स्पष्ट झाले असून १० मतदारसंघांत बंडखोर निर्णायक ठरणार आहेत. शरद पवार विरुद्ध अजित पवार गट अशी थेट लढत ८ मतदारसंघांत होणार असून पाच मतदारसंघांत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार भाजपशी भिडणार आहेत. तर काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत तीन ठिकाणी होणार आहे.  बंडखोरीचा मोठा फटका शहरासह ग्रामीणमधील महत्त्वाच्या मतदारसंघांना बसणार आहे. त्यामुळे २१ पैकी१० मतदारसंघांत बंडखोर महायुती- महाआघाडीच्या विजयाचे गणित जुळवणार आहेत. 

पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. २०१९ मध्ये जिल्ह्यात २१ पैकी १० आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडून आले होते. आता पक्षातील फुटीनंतर अजित पवारांकडे ९ तर शरद पवार यांच्याकडे केवळ एक आमदार राहिले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर भाजप हा जिल्ह्यातील  दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष २०१९ ला ठरला होता. जिल्ह्यात भाजपचे ८ आमदार निवडून आले होते. काँग्रेसचे सध्या तीन आमदार आहेत. आताची सर्वच राजकीय समीकरणे राष्ट्रवादी आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या फुटीनंतर बदलली आहेत. २०१९ ला विरोधात लढलेल्या भाजपाला आता सोबत घेऊन अजित पवार मैदानात उतरले आहेत. जिल्ह्यात ११ जागी अजित पवार गटाचे उमेदवार उभे आहेत, तर १३ जागी शरद पवार गटाचे उमेदवार उभे आहेत.    

महायुती-महाआघाडीतील अनेक इच्छुकांनी उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरी केली आहे. जिल्ह्यात बंडखोरी झालेल्या मतदारसंघांमध्ये पुणे शहरातील कसबा, पर्वती, शिवाजीनगर, कोथरूड, हडपसर, तर ग्रामीणमधील भोर, आंबेगाव, जुन्नर, इंदापूर, पुरंदर या मतदारसंघांचा समावेश आहे. कसब्यात काँग्रेसच्या कमल व्यवहारे, पर्वतीत काँग्रेसचे आबा बागुल, शिवाजीनगरमध्ये काँग्रेसचे मनीष आनंद, कोथरूडमध्ये अजित पवार गटाचे विजय डाकले, हडपसरमध्ये उद्धवसेनेचे गंगाधर बधे, भोरमध्ये भाजपचे किरण दगडे- पाटील आणि शिंदेसेनेचे कुलदीप कोंडे, आंबेगावमध्ये उद्धवसेनेच्या सुरेखा निघोट, जुन्नरमध्ये शिंदेसेनेचे शरद सोनावणे आणि भाजपच्या आशाताई बुचके, इंदापूरमध्ये शरद पवार गटाचे प्रवीण माने, तर पुरंदरमध्ये शरद पवार गटाचे संभाजी झेंडे यांनी बंडखोरी केली आहे. 

पुणे शहरात महाआघाडीला बंडखोरी रोखण्यात अपयश  
पोटनिवडणुकीमुळे चर्चेत आलेल्या कसबा मतदारसंघात काँग्रेसच्या कमल व्यवहारे यांनी बंडखोरी केल्यामुळे महाआघाडीसमोरच्या अडचणी वाढल्या आहेत. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे हेमंत रासने यांच्यात मुख्य लढत आहे. शिवाजीनगरमध्ये काँग्रेसच्याच मनीष आनंद यांनी बंडखोरी केली आहे. भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि काँग्रेसचे दत्ता बहिरट यांच्यात मुख्य लढत आहे. पर्वती मतदारसंघात काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने बंडखोरी केली असून भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या विरोधात शरद पवार गटाच्या अश्विनी कदम मैदानात आहेत. तर हडपसरमध्ये उद्धवसेनेच्या गंगाधर बधे यांनी बंडखोरी केली आहे. हडपसरमध्ये अजित पवार गटाचे चेतन तुपे आणि शरद पवार गटाचे प्रशांत जगताप यांच्यात लढत आहे. मनसेने इथे साईनाथ बाबर यांना उमेदवारी दिली आहे. कोथरूडमध्ये सुरुवातीला बंडाचा झेंडा हाती घेतलेले माजी नगरसेवक अमोल बालवडकर आता चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत कलहाचा मुद्दा मागे पडला असून आता उद्धवसेना आणि मनसेचे तगडे आव्हान पाटील यांच्यासमोर असणार आहे. पाटील यांच्या विरोधात उद्धवसेनेचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे रिंगणात आहेत.

ग्रामीणमध्ये हाय-होल्टेज लढती 
बारामती, इंदापूर आणि आंबेगाव अशा हाय-होल्टेज लढती ग्रामीणमध्ये आहेत. इंदापूरमध्ये शरद पवार गटाचे हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे आहेत. प्रवीण माने यांनी बंडखोरी करत पाटील यांच्या अडचणी वाढवल्या आहेत. आंबेगावमध्ये दिलीप वळसे- पाटलांच्या विरोधात शरद पवार यांनी देवदत्त निकम यांना मैदानात उतरवले आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये थेट लढती 
पिंपरी, चिंचवड, भोसरी आणि मावळमध्ये थेट लढती असणार आहेत. पिंपरीत अजित पवार गटाचे आमदार आण्णा बनसोडे यांच्या विरोधात सुलक्षणा शिलवंत यांना शरद पवारांनी मैदानात उतरवले आहे. चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना थांबवून त्यांचे दीर शंकर जगताप यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात शरद पवारांनी राहुल कलाटे यांना उमेदवारी दिली आहे. भोसरीत भाजपच्या महेश लांडगे यांच्या विरोधात शरद पवार गटाचे अजित गव्हाणे असणार आहेत. 

पवार विरुद्ध पवार; आठ ठिकाणी लढत 
राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत आमने-सामने आहेत.  बारामती, हडपसर, वडगाव शेरी,  जुन्नर, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, पिंपरी या आठ ठिकाणी थेट शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटात लढत होणार आहे.  त्याव्यतिरिक्त शरद पवार गट पाच ठिकाणी भाजपच्या विरोधात, तर अजित पवार तीन ठिकाणी लढत आहेत.  

ठाकरे दोन, तर शिंदे एक ठिकाणी 
उद्धव ठाकरे यांचा पक्ष दोन जागांवर लढवत आहे. कोथरूड आणि ग्रामीणमधील खेड मतदारसंघात ठाकरे यांचे उमेदवार आहेत. तर शिंदे यांचा पक्ष केवळ पुरंदरची जागा लढवत आहे. 

Web Title: For whom will the rebels in 10 out of 21 constituencies in Pune calculate the victory?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.