टेकडीवर फिरण्यास मनाई; वानवडी वनविभागाचा निर्णय, नागरिकांमध्ये नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:44 PM2018-01-20T13:44:01+5:302018-01-20T13:47:04+5:30
आझादनगरमधून वनविभागाच्या टेकडीवर जाण्यासाठी नागरिकांना मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या टेकडीवर नागरिक सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी जातात.
वानवडी : येथील आझादनगरमधून वनविभागाच्या टेकडीवर जाण्यासाठी नागरिकांना मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या टेकडीवर नागरिक सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी जातात.
वानवडी व महंमदवाडीच्या हद्दीवर मधोमध असणाऱ्या वनविभागाच्या टेकडीवर आझादनगर व एनआयबीएम बाजूने जाण्यासाठी मार्ग आहेत. परंतु आझादनगरच्या बाजूने नागरिकांना टेकडीवर जाण्यासाठी वनविभागाकडून भिंत बांधून बंदी करण्यात येणार आहे. मात्र नागरिकांना एनआयबीएमच्या बाजूने जाण्यास परवानगी दिली आहे. आझादनगरच्या नागरिकांना एनआयबीएमच्या बाजूने जाण्यासाठी खूप लांबचा टप्पा पार करून पूर्ण वनक्षेत्राला वेढा घालून जावे लागणार आहे.
वनविभागाने या टेकडीवरील निसर्ग अबाधित राहावा म्हणून चारही बाजूने संरक्षक भिंत बांधली आहे. परंतु टेकडीवर जाण्यासाठी आझादनगर व एनआयबीएमच्या बाजूने थोडी जागा सोडण्यात आली होती. एनआयबीएमच्या बाजूने त्या भागात असणाºया नागरिकांच्या सहभागाने ‘आनंदवन’ म्हणून गेटची निर्मिती करून टेकडीवर आनंदवन फुलवले आहे. या खडकाळ माळरानावर निसर्ग सौंदर्य जपून ठेवण्यासाठी विविध संघटना, लोकप्रतिनिधी, शाळेचे विद्यार्थी, सोसायटीमधील नागरिक व निवृत्त अधिकारी काम करत आहेत. त्यांचे हे काम पाहून शासनाने निधी उपलब्ध करून दिला आहे.
याबाबत नगरसेविका कालिंदा पुंडे, नगरसेवक धनराज घोगरे म्हणाले, ‘‘ आझादनगरच्या बाजूने नागरिकांना टेकडीवर ये-जा करण्यासाठी दरवाजा व वनविभागामध्ये आबालवृद्धांना मोकळ्या हवेत फिरण्यासाठी तसेच वृक्षारोपणासाठी परवानगी मिळावी यासाठी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना पत्र देण्यात आले आहे. तसेच वानवडीतील नागरिकांना या टेकडीवरील निसर्ग सौंदर्याचा जास्तीत जास्त उपभोग घ्याता यावा म्हणून आम्ही प्रयत्नशील राहू.’’
एनआयबीएमच्या बाजूने आनंदवनाच्या प्रवेशद्वारातून त्या भागातील नागरिक टेकडीवर ये-जा करत आहेत. परंतु वानवडीच्या आझादनगरच्या बाजूने नागरिकांना टेकडीवर जाण्यासाठी छोटे प्रवेशद्वार करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्णयावर पुढील काम केले जाईल.
- प्रवीण राऊत, वनरक्षक, वानवडी