बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी रेल्वेच्या अधिकाऱ्याला सक्तमजुरी; CBI च्या न्यायालयाने ठोठावली शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 07:16 PM2022-10-20T19:16:43+5:302022-10-20T19:18:07+5:30
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक (सीबीआय-एसीबी) न्यायालयाने ही शिक्षा सुनावली....
पुणे : बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी मध्य रेल्वेच्या तत्कालीन वरिष्ठ अभियंत्याला पाच वर्षांची सक्तमजुरी व दोन लाख रुपये दंड ठाेठावण्यात आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या भ्रष्टाचार प्रतिबंधक (सीबीआय-एसीबी) न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा निकाल दिला.
सत्यजित रामचंद्र दास (वय ६३, रा. लोणी काळभोर) असे शिक्षा झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. आरोपीने दंड न भरल्यास सहा महिन्यांचा अतिरिक्त साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे.
मध्य रेल्वेच्या घोरपडी येथे वरिष्ठ सेक्शन इंजिनिअर म्हणून कार्यरत असताना बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी सत्यजित दास यांच्याविरोधात ३१ डिसेंबर २०१५ रोजी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नाेंदवण्यात आला होता. दास यांनी एक ऑक्टोबर २००९ ते २१ जानेवारी २०१४ या कालावधीत ज्ञात उत्पन्नापेक्षा ३७ लाख ५४ हजार ३५३ रुपयांची (४८.२३ टक्के) बेहिशेबी मालमत्ता जमविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अभयराज आरीकर यांनी काम पाहिले. त्यांनी बारा साक्षीदार तपासले. आरोपीने लोकसेवक असताना आपले कायदेशीर कर्तव्य पार न पाडता बेकायदा मार्गाने संपत्ती जमा करण्याचा गंभीर गुन्हा केला आहे. त्याचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व दंड ठोठावण्यात यावा. त्यामुळे समाजात अशा गुन्ह्यांविरोधात योग्य संदेश जाईल, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील आरीकर यांनी केला. सरकार व बचाव पक्षाची बाजू ऐकल्यावर न्यायालयाने आरोपीला शिक्षा ठोठावली.