विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासूला सक्तमजुरी; बारामती तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2024 11:36 AM2024-02-16T11:36:18+5:302024-02-16T11:36:53+5:30

या प्रकरणात अन्य एकाला तीन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली...

Forced labor to husband, mother-in-law in case of wife's suicide; Incidents in Baramati Taluk | विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासूला सक्तमजुरी; बारामती तालुक्यातील घटना

विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पती, सासूला सक्तमजुरी; बारामती तालुक्यातील घटना

बारामती (पुणे) : माहेरहून पैसे आणावेत, या मागणीसह अन्य कारणांवरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती व सासूला दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा येथील जिल्हा न्यायाधीश जे. ए. शेख यांनी सुनावली. या प्रकरणात अन्य एकाला तीन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अरबाज मेहमूद पठाण, मुमताज मेहमूद पठाण (रा. चिमणशहामळा, बारामती) व अनिल पोपट मेमाणे अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. करिश्मा अरबाज पठाण या महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल होता. या खटल्यात तिचा पती अरबाज व सासू मुमताज यांना हुंड्याची मागणी केल्याप्रकरणी १० वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी एक वर्षे सक्तमजुरी, तर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंड, अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली. अनिल मेमाणे याने मारहाण केल्याप्रकरणी तीन महिने सक्तमजुरी व एक हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली.

याप्रकरणी मयत करिश्मा हिचे वडील सिराजुद्दीन मेहबूबसाब सय्यद यांनी फिर्याद दाखल केली होती. करिश्मा हिचे लग्न अरबाज याच्याशी झाले होते. तिचा या तिघांकडून छळ केला जात होता. माहेरहून पैसे आणावेत, अशी मागणी केली जात होती. तिला शिवीगाळ, मारहाण केली जात होती. या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक योगेश शेलार यांनी करत आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या खटल्यात सरकार पक्षाकडून ॲड. सुनील वसेकर यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षाला सहायक पोलिस उपनिरीक्षक नामदेव नलवडे व अंमलदार उमा कोकरे यांचे सहकार्य झाले.

Web Title: Forced labor to husband, mother-in-law in case of wife's suicide; Incidents in Baramati Taluk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.